फुलंब्री : ‘इंधनाची बचत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहने इलेक्ट्रिकच्या माध्यमातून सुरू आहेत. आता त्याच धर्तीवर सिकंदराबाद ते छत्रपती संभाजीनगर पहिली इलेक्ट्रिक रेल्वे धावणार आहे,’ माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
फुलंब्री शहरासाठी नव्याने मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार हरिभाऊ बागडे, ‘इफको’चे माजी संचालक त्र्यंबकराव शिरसाठ, माजी सभापती अनुराधा चव्हाण, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, महिला अध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर, शहराध्यक्ष योगेश मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी दानवे म्हणाले, ‘मी या रेल्वेसाठी ८५० कोटी रुपये मंजूर करून घेतले आहे. ही रेल्वे छत्रपती संभाजीनगर ते सिकंदराबाद पर्यंत मार्चअखेर पर्यंत सुरू करणार आहे. त्याचबरोबर जालना येथील नवीन रेल्वे स्टेशनसाठी १७५ कोटी रुपये मंजूर केले आहे. मोदी सरकार आणि शिंदे – फडणवीस सरकार तुम्हाला मदत करायला तयार आहे.’ शेतकाऱ्यांच्या मदतीसंदर्भात ते म्हणाले, ‘आमच्या सरकारने अतिवृष्टीसाठी तीन हेक्टरपर्यंत प्रती हेक्टर १३ हजार रुपये अनुदान दहा मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर देणार आहे. या संदर्भात मी संबंधीत विभागाच्या सचिवाशी बोललो आहे. विजेसाठी जालना येथे पाचशे, तर छत्रपती संभाजीनगरला ७५० कोटी रुपये दिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाला जास्तीच्या दाबाने विद्युत पुरवठा मिळणे सहज शक्य होणार आहे.’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन ढोके यांनी केले. या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी केले. पंतप्रधान स्वानिधी योजनेचे कार्ड व शुभेच्छा संदेश लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परीषद सदस्य जितेंद्र जयस्वाल, आनंदा ढोके, अकबर पटेल, गणेश राऊत, जफर चीस्ती, आप्पासाहेब काकडे, नाथा काकडे, सुचित बोरसे, अजय शेरकर, वाल्मीक जाधव, मुदस्सर पटेल, संजय त्रिभुवन, रौफ कुरेशी, एकनाथ ढोके, गजानन नागरे, राजू प्रधान, देवराव राऊत, देविदास ढगारे, राजेंद्र नागरे, सुमीत प्रधान, शेखर पालकर यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
खासदार आमदार तुमचे सालदार
‘खासदार व आमदार हे तुमचे सालदार असून, ते चांगले काम करतात की नाही, याची तुलना मतदारांनी वेळेवर करायला पाहिजे. आम्ही जर कुठे चुकत असू, तर आम्हाला सांगितले पाहिजे,’ असे दानवे म्हणाले.