आजोबा आणि नातू यांच्यातलं नातं म्हणजे दुधावरच्या सायीसारखं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाच्या बाबतीतही असंच घडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होळीचा सण साजरा करायला ठाण्यातल्या आपल्या निवासस्थानी आले होते. होलिका दहन झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे आपल्या नातवाला दुकानात घेऊन आल्याचं पाहण्यास मिळालं. त्यावेळी दुकानातून एकनाथ शिंदे यांनी आपल्या नातवाला चेंडू घेऊन दिला. नातवाच्या हट्टापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काहीही चाललं नाही. नातू रूद्रांशला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुकानात पोहचले होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदेही मुख्यमंत्र्यांसोबत होते.

नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी एकनाथ शिंदे दुकानात पोहचले
नातवाचा चेंडू घेण्याचा हट्ट पुरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुकानात आले. तिथे त्यांनी नातवाला चेंडू घेऊन दिला. एकनाथ शिंदे नातवाला घेऊन दुकानात काय खरेदी करण्यासाठी आले ते पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होलिका पूजन आणि धुळवड या निमित्ताने ठाण्यात आहेत. त्यांनी कुटुंबासह हे दोन्ही सण साजरे केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं आहे?
मुख्यमंत्री यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सगळ्यांना होळीच्या आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या. तसंच त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाबाबत विचारलं असता, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. हे जनतेचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याचा आढावा घेण्याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यांना सर्वतोपरी मदत करणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या किसननगरमध्ये लहानाचे मोठे झाले तिथे होळीच्या निमित्ताने गेले होते. यावेळेस त्यांच्या सोबत त्यांचा नातू रुद्रांशही सोबत होता. होळीचं दहन झाल्यानंतर रुद्रांशने आजोबांकडे दुकानातून काही तरी घेऊन द्या असा हट्ट धरला, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्याला घेऊन दुकानात पोहचले आणि त्याला चेंडू घेऊन दिला