• Thu. May 1st, 2025

अन् अजित पवारांनी गुपित फोडलं, भाजपमधले ४० ते ४५ आमदार….

Byjantaadmin

Mar 7, 2023

पुणे : गेल्या २८ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला कसब्याचा बालेकिल्ला महाविकास आघाडीच्या मजूबत साथीने काँग्रेसने हिसकावून भाजपला नमवणं अजिबात अवघड नसल्याचं दाखवून दिलं. ज्या प्रभागात भाजपचे ३-३ नगरसेवक आहेत, अशा प्रभागांतूनही काँग्रेसला मतदान झालं. ज्या पेठांमध्ये भाजपच्या हक्काची मतं होती, तिथेही त्यांना दणका बसला. एकूणच मविआने ताकदीने एकत्र येऊन भाजपच्या गडाला मोठ्या कष्टाने सुरुंग लावला. कसब्याच्या निवडणुकीने एकप्रकारे मविआला मोठा आत्मविश्वास दिल्याने येणाऱ्या महापालिका आणि विधानसभेच्या दृष्टीने मविआने ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचेच संकेत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले आहेत.

“मागील काही वर्षांत भाजपमध्ये गेलेले ४० ते ४५ नेते पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. येत्या काळात आपल्या पक्षनेतृत्वाला सांगून त्यातले काही आमदार मूळ पक्षात प्रवेश करु शकतात. शेवटी माणसांकडूनच चुका होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, आपल्या हक्काची काही मते तसेच काही पक्षाची मते यांच्या भरोशावर निवडून येणं त्याकाळी संबंधित नेत्यांना सोपं गेलं. शेवटी एखाद्या आमदाराला मतदारसंघाचा विकास करायचा असतो. त्याला जनतेला कामे दाखवायची असतात. पूर्वीच्या काळासारखं एखाद्या विचारधारेला मानून विरोधात राहिलं तरी चालेल पण पक्ष सोडणार नाही, अशी लोकांची आता मानसिकता राहिलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मागील काळात झालेल्या चुका संबंधित लोक सुधारु शकतात”, असं सांगताना भाजपमधील अनेक आमदारांची येत्या काळात घरवापसी बघायला मिळू शकते, असे संकेतच अजित पवार यांनी दिले.

अजित पवार म्हणाले, “आमच्यातले काही नेते २०१४ ला आम्हाला सोडून गेले, काहींनी २०१९ ला पक्ष बदलला. २०१४ ला भारतीय जनता पक्षाने एक असं चित्र निर्माण केलं की नरेंद्र मोदींचा करिश्मा संपूर्ण भारतावर निर्माण झालाय आणि ते सत्तेत आल्यावर खूप मोठे बदल होतील, असा भ्रम निर्माण केला गेला. त्यांच्याकडे बघून जनतेने कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत मतदान केलं आणि त्यांना क्लिअर मॅजोरिटी मिळवून दिली. राजीव गांधीनंतर देशात कुणालंही असं बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे ज्यांना राजकारण करायचंय पण त्यांना फक्त आपला मतदारसंघ सुरक्षित ठेवायचाय, त्यांना मतदारसंघात विकास करायचाय, असे लोक त्यावेळी भाजपमध्ये गेले”

“पण आता बदलत्या परिस्थितीत तिकडे गेलेले लोक पुन्हा मूळ पक्षात परतू शकतात. ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना सांगू शकतात. आमची चूक झाली. शेवटी माणसांकडूनच चुका होतात. तालुक्याचा-जिल्ह्याचा विकास व्हावा, म्हणूनच लोक पक्ष सोडण्याचे निर्णय घेत असतात. पूर्वीसारखं पक्षाच्या विचारधारेला चिकटून लोक आता राहत नाहीत”, असं सांगताना येणाऱ्या काळात मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेतच अजित पवार यांनी दिले. यावेळी “राजकारणात कालचा शत्रू आज मित्र असतो आणि आजचा मित्र उद्या शत्रू असतो”, असं सांगायलाही दादा विसरले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *