प्रत्येक क्षणाला बेस्ट परफॉर्मन्स द्या;भविष्य उज्वल असेल – अभिजीत देशमुख
‘गोदावरी’च्या स्नेहसंमेलनात जागवली ‘उमंग’
लातूर/ प्रतिनिधी:आयुष्य हे ईश्वराने ठरवून दिलेलं नाटक आहे.त्यात आपला परफॉर्मन्स चांगला असायला हवा.त्यामुळे फार चिंता न करता समोर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला बेस्ट परफॉर्मन्स द्या,आपलं भविष्य उज्वल असेल,असे प्रतिपादन दिशा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अभिजीत देशमुख यांनी केले. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी विद्यार्थ्यांना जगण्याची नवी दिशा दाखवली.
कोळपा येथील श्री.गोविंदप्रभु ग्रामीण व शहरी विकास सेवाभावी संस्था द्वारा संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ बी. फार्मसी,गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ डी.फार्मसी,एमडीए इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक आणि श्री व्ही.डी.देशमुख कॉलेज ऑफ एमसीएच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित ‘गोदावरी उमंग २०२३’ या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अभिजीत देशमुख बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रमेश केवळराम तर व्यासपीठावर लातूरच्या साईप्रेम कन्स्ट्रक्शनचे संचालक हंसराज जाधव,दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले,जानवळ येथील कै.जनार्दन राजमाने शाळेचे प्राचार्य निलेश राजमाने, उद्योजक डी.एस.पाटील कामखेडकर,निलंगा येथील महाराष्ट्र तंत्रनिकेतन इन्स्टिट्यूटचे प्राचार्य भागवत पौळ,श्रीमती प्रेमाताई आंबेकर,संस्थेचे संचालक सुरेश केवळराम,डॉ. शिवपुजे,चंद्रशेखर पारशेट्टी, पत्रकार इस्माईल शेख, विजयकुमार स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशमुख म्हणाले की,आपली कला सादर करण्यासाठी स्नेहसंमेलन हे उत्तम व्यासपीठ आहे.कला जीवनात संधी मिळवून देते पण आज जीवनाबाबत अनिश्चितता दिसत आहे.वास्तवात जगणे कठीण नाही.आयुष्य तसं सोपंच आहे.ईश्वराने ठरवून दिलेल्या नाटकात आपण कसा परफॉर्मन्स देतो त्यावर ते अवलंबून असतं.
देशमुख म्हणाले की,विविध कारणांनी विद्यार्थी आज डिप्रेशन मध्ये जात आहेत.मुलांमध्ये बिनधास्तपणा दिसत नाही. आयुष्याची फार चिंता करू नका. समोर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला उत्कृष्ट काम करा.मन लावून प्रयत्न करा.त्याला चांगल्या पद्धतीने,सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जायला हवे. अति विचार केल्याने अडचणी वाढत आहेत.व्यर्थचिंतन होत आहे.शिक्षकांनीही फक्त शिकवण्याचे काम न करता आयुष्याचे तत्वज्ञान सांगितले पाहिजे.त्याचीच आज नेमकी कमी आहे.त्यामुळे मानसिक कमतरता वाढत आहे.अडचणींना सामोरे जाणारा विद्यार्थी शिक्षकांनी घडवायला हवा. प्रत्येक स्वप्न साकार होत नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकणारा सक्षम विद्यार्थी घडवायला हवा,असेही ते म्हणाले.
डॉ.पौळ यांनी यशस्वी होण्यासाठी मेहनतीची गरज व्यक्त केली.विद्यार्थी जीवनात आपण कोणाच्या संपर्कात राहतो हे महत्त्वाचे असते.चांगले मित्र मार्गदर्शक ठरतात,असे ते म्हणाले.सोनू डगवाले यांनी शैक्षणिक क्षेत्रात संस्थेच्या वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.विद्यार्थ्यांना घडविण्याचा ध्यास घेतलेली ही संस्था असल्याचे निलेश राजमाने म्हणाले.लातूर लगत असणाऱ्या या संस्थेने शिक्षणाचा उत्तम दर्जा कायम राखला आहे.एखादे विद्यापीठ शोभावे,असा संस्थेचा परिसर असल्याचेही ते म्हणाले. डी.एस.पाटील यांनी संस्थेने शहरी व ग्रामीण असा मध्य साधून शेतकऱ्यांची लेकरं घडविण्यासाठी काम केले असल्याचे मत व्यक्त केले.
रणजित केवळराम यांनी संस्थेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.प्रारंभी दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.संस्थेच्या वतीने उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.फार्मसीचे प्राचार्य डॉ.राहुल सोळुंके यांनी प्रास्ताविक व अहवाल वाचन केले.उत्कृष्ट विद्यार्थी,उत्कृष्ट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.वर्षभरात कॅम्पसमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स दिल्याबद्दल बी. फार्मसी चौथे वर्ष आणि डी. फार्मसी अंतिम वर्षाच्या वर्गाला जनरल चॅम्पियनशिप देण्यात आली.संस्थेचे सहसचिव राहुल केवळराम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.