भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि माजी मंत्री व काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्यात कायमच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत असतो. आता पुन्हा एकदा संभाजी पाटलांनी देशमुखांना डिवचलं आहे. ज्यांना स्वत: च्या मतदारसंघात मुताऱ्या बांधता आल्या नाहीत, त्या अमित देशमुखांनी आतापर्यंत किती निधी आणला असा हल्लाबोल निलंगेकरांनी केला आहे. आता निलंगेकरांच्या टीकेनंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित देशमुखांवर सडकून टीका केली. निलंगेकर म्हणाले, भाजपाच्या 2014 ते 2019 या सत्ताकाळात जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात भरघोस विकास निधी आला. अनेक कामं झाली, मात्र सत्ता बदल झाल्यावर अडीच वर्षात विकास निधी अत्यल्प आला. त्यातही निलंगा तालुक्यावर कायमच देशमुखांनी अन्याय केला आहे. देशमुखांकडून कायमच निलंगा आणि निलंगेकरांचा दुस्वास करण्यात आला आहे
मागील इतिहास जर काढला तर लातूरमध्ये अमित देशमुखांनी अनेक वर्ष सत्ता उपभोगली, त्या काळात आलेला निधी आणि मी पालकमंत्री असताना आलेला निधी किती? हे एकदा तपासा. देशमुखांना लातूर येथे साध्या मुताऱ्या बांधता आल्या नाहीत. आमच्या सत्तेच्या काळात आम्ही त्या बांधल्या आहेत अशी बोचरी टीका निलंगेकर यांनी यावेळी केली.
मी कोणाच्या खोलात नाही जात. मागचा सगळा इतिहास काढा आणि 2014 मधला भाजपच्या काळातील सरकारचा इतिहास काढा. माझं जाहीर आव्हान आहे तिथल्या आमदाराला. त्यांनी माझ्यासोबत बसावं आणि 2014 आणि 2019 सालचा इतिहास काढावा आणि सांगावं निधी कधी, कोणत्या साली जास्त आला आहे. त्यांच्या संपूर्ण काँग्रेसच्या कालावधीत जेवढा निधी आला नाही, तेव्हा आम्ही आमच्या सरकारच्या काळात आणला असल्याचंही आमदार संभाजी पाटील निलंगेकर यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाहीत अन् त्यांच्या मित्रांचा फायदा करून देतात !