माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते
लातूर जिल्हा तेली समाज जनगणना २०२३ पुस्तकाचे प्रकाशन
व राज्यस्तरीय तेली समाज वधूवर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन
लातूर प्रतिनिधी: रवीवार दि. ५ मार्च २०२३ तेली समाज कष्टाळू असून स्वतःच्या पायावर उभा राहणारा आहे. या समाजाच्या शासनाकडे काही मागण्या आहेत. आम्ही त्याच्या या प्रश्नांना मांडून तत्परतेने सोडवू अशी ग्वाही, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालमंत्री तथा आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी देऊन तेली समाजाची परंपरा शतकांची असून परीश्रमाने सर्वजण प्रगती करीत असल्याचे गौरवोदगार यावेळी बोलतांना त्यांनी काढले. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते रविवार दि. ५ मार्च रोजी दुपारी लातूर शहरातील श्याम मंगल कार्यालय येथे लातूर जिल्हा तेली समाज सेवाभावी संस्था व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लातूर जिल्हा तेली समाज जनगणना २०२३ पुस्तकाचे प्रकाशन व राज्यस्तरीय तेली समाज वधू वर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लेखक राजेंद्र कोरे, भूषण करडीले, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी नगरसेविका छाया चिंदे, जयश्री पाटील, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा लातूरचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ खडके,
रावसाहेब राऊत, निखिल कासनाळे, बालाप्रसाद बीदादा, पप्पू देशमुख, प्रभाकर करंजकर, भागवत कोरे, उमाकांत राऊत, बाळासाहेब होळकंबे, गजानन सावकार, सूर्यवंशी गजानन, शेलार शिवशंकर, शिरसागर पडिले, संजय निलेगावकर, गणेश देशमुख, संजय मगर, गुरुपतआप्पा कलशेट्टी, रवी कोरे आदीसह तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते माजी नगरसेविका छायाताई चिंदे यांना तेली समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलतांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, तेली समाज बांधवांच्या आगळयावेगळया सोहळ्याला उपस्थित राहतोय याचा मला मनस्वी आनंद होत आहे. लातूर जिल्ह्यात व शहरात तेली समाज मोठ्या संख्येने आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. तेली समाज चाणाक्ष आहे, त्यांनी त्यांची संख्या जनगणना करून दाखवली जे सरकारला शक्य होत नाही ते तेली समाजाने जनगणना केली याबद्दल कौतुक केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, अजूनही जातीनिहाय जनगणना करणे बाबत लोकसभा विधानसभेत चर्चा होते, आपली ओळख पार्श्वभूमी इतिहास याचा परिचय उहापोह समाजाला होणे गरजेचे आहे. तेली समाजाच्या शासनाकडे काही मागण्या आहेत. मी तेली समाज बांधवांच्या प्रश्नांना वाच्या फोडेन दिल्ली, मुंबईतील कुठलेही प्रश्न असोत आम्ही तत्परतेने कार्यरतराहून ते सोडवू अशी ग्वाही दिली. समाज कष्टाळू आहे, स्वतःच्या पायावर उभा राहणारा आहे, या समाजाची परंपरा शतकांची आहे, या समाजाचे बोधचिन्ह प्रेरणादायी आहे. या समाजाने परीश्रमाने प्रगती केली आहे. लेखक राजेंद्र कोरे हे मंदिर, चर्च, गुरुद्वारा, मस्जिद, बुद्ध विहार यांचे डिझाईन मोफत करून देतात हे निश्चीतच कौतुकास्पद असल्याचे सांगितले. लातूर एक प्रगत शहर आहे लातूर गतिमान आहे सध्या मुली शिक्षण घेऊन नोकरी करत आहेत व्यवसाय करत आहेत. तेली समाजानेही मुलींना विविध क्षेत्रात उच्च शिक्षण द्यावे, मुलींना समान संधी द्यावी असे आवाहन आमदार देशमुख यांनी करून तेली समाजाच्या कार्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी राऊत यांनी करून तेली समाजाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली तर महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा लातूरचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ खडके यांनी मनोगत व्यक्त करून महाराष्ट्र रांतिक तैलीक महासभेच्या कार्याची उपस्थितांना माहिती दिली.