• Wed. Apr 30th, 2025

शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या नव्हे, माझ्या वडीलांनी केली – उद्धव ठाकरेंचा घणाघात

Byjantaadmin

Mar 5, 2023

शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांनी नव्हे माझ्या वडीलांनी केली. शिवसेना तोडण्याचे फोडण्याचे काम जे करीत आहात त्यांना मी सांगेल की, तुम्ही मराठी माणूस आणि हिंदुत्वावर घाव घालत आहेत. हिंदुत्वाला धुमारे फुटत असताना कारस्थान करीत आहात. भाजपला गल्लीतील कुत्रे ओळखत नव्हते. ज्यांनी साथ दिली त्यांना संपवत आहेत. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

​​​​​​उद्धव ठाकरे यांची आज खेड येथील गोळीबार मैदानात सभा सुरू आहे. या सभेत उद्धव ठाकरे हे सभेला मार्गदर्शन करीत आहेत. तत्पूर्वी सुषमा अंधारे यांनी आपले घणाघाती भाषण करून शिंदे गट, भाजप, किरीट सोमय्यांना लक्ष केले.

चिरडण्याची ताकद एका बोटात

ठाकरे म्हणाले, जे ढेकणं आपले रक्त पिऊन फुगली त्यांना चिरडण्याची ताकद एका बोटात आहेत. तोफेची गरजही नाही. आमच्याकडे मुलुखमैदानी तोफ आहे. संजय कदमांच्या रुपाने आपली तोफ परत आपल्याकडे आली. तोफा देशद्रोह्यांविरोधात वापरायच्या असतात.

निवडणूक आयोग चुना लावणारा आयोग

उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना आजपर्यंत जे – जे मिळाले ते खोक्यात बंद झाले. माझ्या हातात आज काही नाही. रिकामे आहे, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे आशिर्वाद मागायला आलो आहे. तुमची साथ हवी. जे भुरटे चोर, गद्दार आहेत त्यांना सांगतो की, नाव, शिवसेना पक्षाचे चिन्ह चोरला पण शिवसेना चोरू शकत नाही. मला निवडणूक आयोगाला सांगायचे की, तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला खेडमधील सभा पाहायला या. चुना लावणारा तो आयोग आहे.

संजय कदम यांचा ठाकरे गटात प्रवेश

या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचा ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेशही झाला आहे. त्यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही ठाकरे गटात आज प्रवेश केला. यावेळी ठाकरेंनी शिवबंधन हाती बांधले.

ठाकरे गटात जाण्याच मज्जाव केला होता

संजय कदम म्हणाले, शिवसेना म्हणजे आम्हीच असे गद्दार म्हणत आहेत. त्यातून ते लोकांच्या मनात संम्रभ निर्माण करीत आहेत. पण कोकणात आम्ही दाखवून देत आहोत की, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बांधील आहोत. या तालुक्यात सभा होणार असल्याने रामदास कदम अनेकांना जाण्यास मज्जाव करीत होते. कार्यकर्त्यांना ते चौकशीची भिती दाखवत होते. आमचे बॅनर फाडले गेले.

रामदास कदम भित्रे

संजय कदम म्हणाले, आम्ही शिवसैनिक म्हणून ज्या केसेस घेतल्या त्या आम्ही घेतल्या. रामदास कदम हे भित्रे आहेत त्यांच्यावर एकही केस नाही. नारायण राणेंवर ते आरोप करायचे. आता आम्ही रामदास कदमाला काय म्हणायचे. रामदास कदम कुणाचेच नाहीत. रामदास कदम जेथे राहतात तेथील सर्व पक्षाचे पदाधिकारी ठाकरे गटात आहेत. शिवसेनेचाच नगराध्यक्ष खेडमध्ये बनणार. जिल्हा परिषदही ठाकरेंच्याच शिवसेनेची सत्ता येईल.

आम्ही झोडपून काढू

संजय कदम म्हणाले, भास्कर जाधव आणि मी आम्ही दोघे झोडपून काढू आणि विजय मिळवू. रामदास कदमाला वाटते की, मीच फूटीचे राजकारण केले. मी मुळचा शिवसैनिक माझ्यातील शिवसैनिक जागा झाला. शिवसेना संकटात असताना मी शिवसेनेत आलो. मला कसलीच अपेक्षा नाही.

रामदास कदमांना माफी मागावी लागली

संजय कदम म्हणाले, रामदास कदम आजपर्यंत दुसऱ्यांची घरे फोडत होते. पण आज त्यांची तिच अवस्था होत आहे. त्यांनी उत्तर सभा घेतली पुढे काय झाले? अखंड महाराष्ट्रातील लोकांनी रामदास कदमांवर रोष व्यक्त केला. त्यांना माफी मागावी लागली. रामदास कदमांनी कुटुंब उद्धवस्त करण्याचे काम केले पण शहरात ते जावून सांगतात की, माझ्यावर वाईट वेळेवर आली.

सुषमा अंधारेंचा सीएम शिंदेंना टोला

सुषमा अंधारे म्हणाल्या, मराठी माणसांच्या भल्यासाठी आम्ही सभा घेत आहोत. किरीट भाऊंचा गझनी झाला. ते मुळ मुद्दे सोडून कोकणातच वारंवार फिरतात. एकनाथ शिंदे नवे अदानी आणि अंबानी तयार करीत आहेत.

चाळीस आमदारांचे डिपाॅझिट जप्त होणार – अंधारे

सुषमा अंधारे म्हणाले, किरीट भाऊ डंपिंग ग्राऊंडवर इकडे तिकडे रिकाम्या बाॅटल शोधण्यापेक्षा दुसरे काम करा दुसरीकडील भ्रष्ट्राचाराकडे लक्ष द्या. एकनाथ भाऊ कसब्यात ठाकरेंनी दोनच मिनिट ऑनलाईन सभा घेतली. तर विजय झाला आता ते महाराष्ट्र दौरा करीत आहेत चाळीस आमदारांचे डिपाॅझिट जप्त होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *