• Wed. Apr 30th, 2025

…तर रवींद्र धंगेकरच पुणे लोकसभेचे उमेदवार?

Byjantaadmin

Mar 4, 2023

पुणे : पुणे हा एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे नेतृत्व पुणेकरांनी मान्य केलं होतं.२००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. महापालिका आणि विधानसभेतही या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. मात्र, २०१४ साली संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट आली यांनी या लाटेत पुणे सुद्धा भाजपमय झालं. २०१४ पुणे शहराचा खासदार आणि आमदारही भाजपचे झाले. मात्र, कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचा आठ वर्षाचा आमदारकीचा वनवास आता संपला आहे.

कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजपला रोखणे शक्य असल्याचा विश्वास आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. याच विश्वासाच्या जोरावर आता पुणे लोकसभेचे गणितं सुद्धा बदलणार असल्याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. जागा वाटपाच्या सूत्रात आघाडीमध्ये पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकर हे खासदारकीचे काँग्रेसचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा राजकीय पंडित करत आहेत.

देशात लोकसभेच्या निवडणुका मार्च २०२४ ते मे २०२४ या दरम्यान होण्याची शक्यता आहे. सध्या पुणे शहरात जर पक्षीय बलाबळ पाहिलं तर शहरातील ८ विधानसभा मतदारसंघात भाजपचे ५, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचा आता १ आमदार आहे. यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील काही मतदारसंघात भाजपचा निसटता विजय झाला होता. यात शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांचा ५१२४ इतक्या मतांनी निसटता पराभव केला होता. तर खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांना भाजपच्या भीमराव तापकीर यांच्याकडून अवघ्या २५९५ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तिकडे पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात देखील भाजपची अशीच अवस्था राहिली आहे या मतदारसंघात भाजपच्या सुनील कांबळे यांनी काँग्रेसच्या रमेश बागवे यांचा अवघ्या ५०१२ मतांनी पराभव केला होता. तर पर्वती मध्ये माधुरी मिसाळ आणि कोथरूड मध्ये चंद्रकांत पाटील यांनी मात्र मोठा मताधिक्यांनी विजयी प्राप्त केला होता.

दुसरीकडे वडगाव शेरी आणि हडपसर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीने एकत्रित ताकद लावल्यास २०१९ च्या निवडणुकीत निसटता पराभव स्वीकाराव्या लागलेल्या मतदारसंघात देखील विजय शक्य होणार असल्याचा दाट विश्वास आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळेच पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन विजयाचे स्वप्न महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पाहत आहेत.

कसबा पोटनिवडणुकीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा वापरली तरी भाजपला उपयोग झालेला नाही. पुणे शहरावर असलेली भाजपची पकड आता सैल होत आहे असं दिसून येत आहे. याची प्रचिती कसबा पोटनिवडणुकीत देखील आली. हीच बाजू धंगेकरांसाठी जमेची आहे. त्यामुळे अवघ्या वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीतही रवींद्र धंगेकर हे जायंट किलर ठरतील आणि पुणे लोकसभेवर पुन्हा एकदा सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *