जवळपास रोज एक पत्रकार परिषद घेत विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडणारे, त्यांचे घोटाळे काढणारे आणि गाडीभर पुरावेही देणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याच कार्यालयात श्रवण यंत्राचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
गैरव्यवहार प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या मुलुंड पूर्वमधील निर्मलनगर कार्यालयाचे प्रमुख प्रफुल्ल कदम यांनी नवघर पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. त्यावरून दोघांवर गुन्हे दाखल झाल्याचे समजते.
नेमके प्रकरण काय?
प्रफुल्ल कदम हे सोमय्या यांच्या कार्यालयाचे गेल्या पाच वर्षांपासून काम पाहतात. सोमय्या हे युवक प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. या ट्रस्टचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केले होते. ट्रस्टकडून दिव्यांग, एचआयव्हीग्रस्तांसाठी काम केले जाते. त्यासाठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन आणि मुंबई महापालिकेची मदत घेतली जाते. या ट्रस्टमध्येच श्रवण यंत्रांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.
दोघांनी केला गैरव्यवहार…
युवक प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट 2017-2018 पासून ‘ऐका स्वाभिमानाने’ हा उपक्रम राबवते. यात ज्येष्ठ नागरिकांना फक्त पाचशे रुपयांत श्रवणयंत्र दिले जाते. या श्रवणयंत्र वाटपामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहेच. ट्रस्टतर्फे आयोजित शिबिरातून श्रवण यंत्रांचे वाटप होते. मात्र, प्रकल्प प्रमुख प्रज्ञा जयंत गायकवाड आणि श्रीकांत रमेश गावित यांनी हा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे
आणि प्रकरण समोर…
ट्रस्टने काही दिवसांपूर्वी प्रज्ञा गायकवाड यांना श्रवण यंत्राचा हिशोब विचारला. तेव्हा त्यांनी सर्व यंत्रांचे वाटप झाल्याचे सांगितले. मात्र, याची तपासणी केली असता 1472 यंत्रे आणि 7 लाख 36 रुपयांची तफावत आढळली. याबाबत अधिक चौकशी केली असता प्रज्ञा गायकवाड आणि श्रीकांत गावित यांनी गैरव्यवहाराची कबुली दिली. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. हा गैरव्यवहार कधीपासून सुरू होता, हे तपासात समोर येईल.