तुम्हाला चपटी देणारा नेता पाहिजे का, असा सवाल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जनतेला विचारला. त्या कौठळी (जि. बीड) येथील जल जीवन मिशन योजनेच्या शुभारंभ सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनेचे नेते धनजंय मुंडे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली. राजकारणात चारित्र्यहीन व्यक्ती व्हिलन असे, असा टोलाही त्यांनी हाणला.
पंकजा यांच्या या टीकेवर आता धनंजय मुंडे काय उत्तर देतात हे पाहावे लागेल. विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यावेळी पंकजा यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. मात्र, आता त्या पुन्हा एकदा आक्रमक झाल्यात.
पाणी हवे की…
पंकजा मुंडे म्हणाल्या की, तुम्हाला कसा नेता हवा आहे? घरा-घरात पाणी देणारा नेता हवा आहे की, घरा-घरात चपटी देणारा नेता हवा आहे. पिढी घडवणारा नेता हवा आहे की, बिघडवणारा नेता हवा आहे? असा सवाल त्यांनी केला.
उदघाटनाला भलतेच…
परळीमध्ये भुयारी गटार योजनेच्या नावाखाली रस्ते फोडले. त्यानंतर विकास केल्याची दवंडी पिटवली जातेय, असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना हाणला. योजना केंद्राची, सरकार आमचे आणि उदघाटनाला भलतेच पुढे येतात, असा चिमटाही त्यांनी काढला.
मुंडे साहेबानंतर…
मुंडे साहेबानंतर तुम्ही सगळे माझे नाव घेता. कारण तुम्हाला चांगला नेता हवा आहे. मी निवडणूक हरले आणि तुमचे मोबाइलवरचे मेसेज बंद झाले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. खोटे गुन्हे दाखल करणारा, तमाशा दाखवणार, मत विकत घेणारा, पैसे वाटणारी चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणातला व्हिलन असतो, अशी टीका त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केली.