मुंबई:-शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात शिवसेनेचे चिन्ह कोणाला मिळणार, याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग उद्या देण्याची शक्यताय. निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला म्हणणे मांडण्यासाठी दिलेली मुदत शुक्रवारी (7 ऑक्टोबर) संपतेय. त्यामुळे हा निर्णय उद्याच येण्याची शक्यता वर्तवली जातेय.
एकीकडे काल झालेल्या दसरा मेळाव्यात शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेनेतला संघर्ष टोकाला गेलेला दिसला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी परस्परांवर तुफान चिखलफेक केलेली उभ्या महाराष्ट्राने पाहिली.
ठाकरेंची आज बैठक
निवडणूक आयोगाने म्हणणे मांडण्यासाठी दिलेली मुदत उद्या संपते आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची आज एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीत वकील उपस्थित असणार आहेत. शिवाय निवडणूक आयोगाकडे आज म्हणणे मांडायचे की उद्या यावर खल होणार असल्याचे समजते. त्यानंतर कागदपत्रे दाखल करण्यासाठीही ठाकरे गटाकडून वेळ मागितला जाण्याची शक्यता आहे.
पुढे काय होणार?
अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होतेय. त्यातच पक्ष चिन्हाचा मुद्दा निवडणूक आयोगासमोर आहे. हे पाहता धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेकदा असे प्रसंग उद्भवले असून, त्यावेळी चिन्ह गोठवण्यात आले आहे.
खरी शिवसेना आमचीच आहे, असा दावा शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून केला जातोय. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अनेकदा विधिमंडळातील पक्ष आमचाच असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला होता. तोच दावा निवडणूक आयोगाकडे करण्यात आला आहे. लोकसभा, विधानसभेत शिंदे गटाला शिवसेना म्हणून अधिकृत मान्यता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, ठाकरे गट खरी शिवसेना आमचीच म्हणतोय. आता यावर काय निर्णय येणार, हे पाहावे लागेल.
तर हे चिन्ह घेणार
निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले अथवा एखाद्या गटाला चिन्ह दिले, तर पुढे काय, याची तयारीही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी करून ठेवल्याचे समजते. ठाकरे गटाकडून सध्या गदा चिन्ह घेण्यावर विचार सुरू आहे. तर शिंदे सेना तलवार हे चिन्ह घेण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. दसरा मेळाव्यातही एकनाथ शिंदेच्या भाषणापूर्वी एक तलवारही व्यासपीठावर आणण्यात आली होती. ही त्याची तयारी असल्याचे समजते.