• Wed. Apr 30th, 2025

मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…

Byjantaadmin

Oct 6, 2022

मुंबईतील बीकेसी मैदानावर बुधवारी मुख्यमत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी केलेल्या भाषणातून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. तर राहुल गांधी यांच्या पदयात्रेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला, अशा आशयाचं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं.

या विधानानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता नाना पटोले म्हणाले, “राहुल गांधीची पदयात्रा ही देशाच्या तिरंग्यासाठी आहे. त्यांची पदयात्रा आता तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये लोक चळवळ बनली आहे. गावोच्या गावे राहुल गांधीच्या पदयात्रेत सामील होत आहेत. भरपावसात आणि भरउन्हात लोकं राहुल गांधीच्या पदयात्रेत सामील होत आहेत.”

“त्यांच्या पदयात्रेची राज्याचा मुख्यमंत्री अशा पद्धतीने थट्टा-मस्करी करत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. या राज्याचे मुख्यमंत्रीकोणत्या विचारांचे आहेत, याबाबत आम्हाला काही देणं-घेणं नाही. पण महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा आहे, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशा पद्धतीने चेष्टा-मस्करी करत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे” अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

नाना पटोले पुढे म्हणाले, “काँग्रेसला त्यांच्या टिंगल-टवाळीमध्ये कसलाही रस नाही. राहुल गांधी हे आज देशाचा तिरंगा आणि संविधान वाचवण्यासाठी आणि लोकांना न्याय देण्यासाठी तळमळीने काम करत आहेत. त्यामुळे लोकं त्यांच्याशी जोडली जात आहेत. हे त्यांना बघवत नाही, विशेषत: भाजपाला. मुख्यमंत्री काल दसरा मेळाव्यात वाचून भाषण करत होते. ते भाजपाचं भाषण होतं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी लिहिलेलं भाषण ते वाचत होते, असं चित्र काल महाराष्ट्र पाहत होता. पण काँग्रेसला अशा पद्धतीच्या तमाशात कुठलाही रस नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed