नवी दिल्ली : पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा सभापती आदी मोठ्या पदांपर्यंत देशातील महिला पोचत असताना ईशान्येकडील नागालॅंड विधानसभेत गेल्या ६० वर्षांत एकही महिला आमदार निवडून येऊ शकली नव्हती. मात्र, आज इतिहास घडला असून स्वातंत्र्यानंतर तब्बल ६० वर्षांनंतर नागालॅंडच्या विधानसभेत महिला पोचली आहे. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (NDPP) हेकानी जाखलू नागालॅंडच्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत
ईशान्येकडील नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या तीन राज्यांतील निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. या तीनही राज्यांतील जनतेचे डोळे निकालाकडे होते. पण, सर्वाधिक नजर नागालँडकडे होती. नागालँड राज्य १९६३ मध्ये अस्तित्वात आले. त्याला ६० वर्षे झाली. पण आजपर्यंत एकही महिला आमदार निवडून आलेली नव्हती. मात्र, हेकानी जाखलू यांनी इतिहास घडवत प्रथमच नागालॅंडच्या विधानसभेत महिला म्हणून पाऊल ठेवले आहे.
नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (NDPP) हेकानी जाखलू ह्या दिमापूर-३ या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्यांनी लोक जनशक्ती पक्षाच्या इगेटो झिमोमी यांचा १५३६ मतांनी पराभव केला. सात महिन्यांपूर्वीच राजकारणात प्रवेश केलेल्या ४७ वर्षीय हेकाणी यांना १४ हजार ३९५ मते मिळाली आहे.
कोण आहेत हेकानी जाखलू?
हेकानी जाखलू या व्यवसायाने वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. दिमापूरमधील हेकानी जाखलू यांनी दिल्ली आणि लंडन येथे शिक्षण घेतले आहे. त्यांनी तब्बल १८ वर्षे एनजीओमध्ये काम केले आहे. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर त्या भारतात परतल्या होत्या. त्यांनी सात महिन्यांपूर्वी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांचे पती अलिजा जाखलू दिमापूरमधील मोठे कंत्राटदार आणि व्यापारी आहेत.