नाशिकमधील घोटी गावाजवळ ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना चोप दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरेंमधील सत्तासंघर्ष आता कार्यकर्त्यांपर्यंत पेटल्याचे दिसून येत आहे.
नेमके काय झाले?
मुंबईत आज ठाकरे व शिंदे गटाचे दसरा मेळावे आहेत. यासाठी दोन्ही गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे जात आहेत. नाशिकमधूनही शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या बसमधून मुंबईला जात होत्या. त्याच वेळी जळगाव येथील शिंदे गटाचे कार्यकर्ते जीपमधून मुंबईला जात होते. घोटी गावाजवळ ही दोन्ही वाहने एकमेकांजवळ आल्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात तसेच बसमधील महिला कार्यकर्त्यांविरोधात घोषणाबाजी केली. तसेच, बसकडे निर्देश करत आक्षेपार्ह हावभाव केल्याचा आरोप महिला शिवसैनिकांनी केला.
वाहनातून बाहेर खेचत दिला चोप
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या अशा वागणुकीमुळे संतापलेल्या महिला शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची जीप थांबवली. नंतर बसमधून उतरत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला. यावेळी महिला शिवसैनिकांनी जीपमधून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर खेचत चोप दिला. नंतर काही जणांनी महिला शिवसैनिकांची समजूत घातली. त्यामुळे शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना सोडून दिले व ते दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघाले.
नाशिक मुंबई महामार्गावर शिवसेना गट आणि शिंदे गटात राडा,
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांने चालत्या वाहनातून अश्लील इशारे केल्याचा महिला शिवसैनिकांचा आरोप, गाडी थांबवून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप pic.twitter.com/4ra9dOrmel— News18Lokmat (@News18lokmat) October 5, 2022