इंदूरमध्ये पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आलेल्या BM फार्मसी कॉलेजच्या महिला प्रिंसिपलचा शनिवारी पहाटे पावणे 4 च्या सुमारास मृत्यू झाला. त्या गत 5 दिवसांपासून येथील चोइथराम रुग्णालयात दाखल होत्या. त्यांच्यावर आशुतोष श्रीवास्तव नामक माजी विद्यार्थ्याने कॉलेज कॅम्पसमध्ये हल्ला केला होता. तो मार्कशीट न मिळाल्याने व अन्य एका प्राध्यापकाने चाकू हल्ल्याचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी कॉलेज व्यवस्थापनावर नाराज होता. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपी विद्यार्थ्याविरोधात रासुका अंतर्गत कारवाई केली आहे.
सिमरोल टी आय आर एन भदौरिया यांनी सांगितले की, आरोपी आशुतोषने प्रिंसिपल विमुक्ता शर्मा यांच्यावर बादलीभर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले होते. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीने ज्या पंपावर पेट्रोल खरेदी केले त्या पंपाचा मालक व ज्या स्टोअरवरून बादली खरेदी केली त्या दुकानदाराचा जबाब नोंदवला आहे. घटनेच्या प्रत्यक्षदर्शी इलेक्ट्रिशिअननेही आशुतोषने बादलीभर पेट्रोल प्रिंसिपलवर ओतल्याची पुष्टी केली आहे.
डॉक्टर म्हणाले – जखमा चिघळल्याने अवयव फेल झाले
चोइथराम हॉस्पिटलचे डॉक्टर अमित भटनागर यांनी सांगितले की, डॉक्टर विमुक्ता शर्मा यांना सोमवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी, तेजाती नगर स्थित गौरव रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले होते. त्यांची स्थिती अत्यंत गंभीर होती. त्या 90 टक्के भाजल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले. पण अखेर शनिवारी पहाटे पावणे 4 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. विमुक्ता यांना हाय एंड व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले. गत 5 दिवसांत त्यांचे विविध अंतर्गत अवयव फेल झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांना अनेकदा सीपीआरही द्यावा लागला होता. पण भाजलेल्या जखमा चिघळल्यामुळे त्यांचे अवयव हळूहळू निकामी होत गेले. शेवटच्या काही तासांत त्यांच्या महत्त्वपूर्ण अवयवांनी काम करणे बंद केले होते, असेही डॉक्टरांनी यावेळी सांगितले.
आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
आरोपी आशुतोषने घटनेच्या 4 दिवस अगोदर नवे मोबाइल सिम खरेदी केले होते. प्रिंसिपिलला पेटवून दिल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तिथे उपस्थित साध्या वेशातील एका पोलिसाने त्याला बोलण्यात गुंग ठेवून पकडले. या घटनेत आरोपीच्याही शरीराचा काही भाग जळाला होता. त्यामुळे त्याला 2 दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले. सध्या तो पोलिसांच्या कोठडीत आहे.
कॉलेजमध्ये असा झाला होता हल्ला
बीएम कॉलेजमध्ये सुरक्षारक्षक नाही. इलेक्ट्रीशियन स्पॉट इन्चार्ज अलंकार गायकवाड व एक महिला कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, प्राचार्या सायंकाळी 4:45 च्या सुमारास कॉलेज कॅम्पसच्या सर्व्हिस रोडवर आल्या. त्यांनी 150 मीटर अंतरावरील झाडावरून बिल्वपत्र तोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या गाडीत बसत असताना आरोपीने प्लास्टिकच्या बादलीत आणलेले पेट्रोल त्यांच्या अंगावर फेकले. त्यात त्यांचे संपूर्ण शरीर ओले झाले. त्या गाडीतून बाहेर पडल्या. त्यानंतर आरोपीने लायटरच्या मदतीने त्यांना पेटवून दिले. यावेळी त्यांची आरोपीशी धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर जळालेल्या स्थितीतच 150 मीटर अंतरावरील आपल्या ऑफिसच्या धाव घेतली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मुख्याध्यापकांचा आरडाओरडा ऐकून दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी त्यांचे कपडे फाडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. पायपुसणीचाही वापर केला. त्यानंतर कॉलेजच्या टी-शर्टने झाकून त्यांना त्यांच्याच कारने रुग्णालयात नेले. त्या जवळपास 90 टक्के भाजल्या होत्या.
प्राध्यापकावर केला होता चाकू हल्ला
आरोपी आशुतोषने फार्माच्या 7व्या सेमिस्टरच्या मार्कशीटवरून गोंधळ घातला होता. त्याने गत ऑक्टोबरमध्ये या प्रकरणी विजय पटेल नामक प्राध्यापकावर चाकू हल्ला केला होता. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. प्रोफेसर पटेल यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तातडीने विद्यापीठात गेले आणि 3 नोव्हेंबर 2022 रोजी आशुतोषची रखडलेली मार्कशीट घेऊन आले. कॉलेजमध्ये मार्कशीट आणल्याची माहिती आशुतोषच्या वडिलांना देण्यात आली. पण तो घ्यायला आला नाही. आरोपीने या प्रकरणी प्राचार्य शर्मा यांना धमकीचे अनेक मेसेज पाठवले होते.
