• Wed. Jun 18th, 2025

अमित शहांच्या रॅलीतून परतणारे 15 जण ठार:​​​​​​​ट्रकने 3 बसला दिली धडक

Byjantaadmin

Feb 25, 2023

मध्य प्रदेशातील सिधी येथील चुरहट-रीवा राष्ट्रीय महामार्गावरील बडखरा गावात शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू झाला. सुमारे 50 जण जखमी आहेत. त्यापैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांपैकी आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन बसेसला जोरदार धडक दिली

या बसेसमध्ये सतना येथे आयोजित कोल समाजाच्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी लोक गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते पुन्हा मध्यरात्री परतले होते. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह देखील सहभागी झाले होते. CM शिवराजसिंह हे सिधीमध्ये असतानाच त्यांना बस अपघाताची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेतली.

चहा-पाण्यासाठी बसमधील लोक थांबले होते
सतना येथे आयोजित कोल जमाती महाकुंभ कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी विंध्य विभागातील सर्व जिल्ह्यांना लोकांना आणण्यासाठी 300 बस भरण्याचे टार्गेट देण्यात आले होते. सायंकाळी 5.30 वाजता कार्यक्रम संपला. सर्व बस सतना येथून थेट मोहनिया बोगद्यामार्गे रामपूर बघेलान आणि रेवामार्गे जात होत्या.

बोगद्यापासून 1 KM अंतरावर असलेल्या सिधी जिल्ह्यातील चुरहट पोलिस स्टेशन हद्दीतील बरखडा गावाजवळ तीन बस काही काळ थांबल्या होत्या. येथे प्रवाशांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, मागून येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रकचे टायर फूटल्याने तिन्ही बसेसला धडक दिली. त्यावेळी बसमधून 50 ते 60 प्रवासी होते.जखमींना रेवा येथील संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. रात्रीच मुख्यमंत्री शिवराज घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्माही उपस्थित होते. तत्पूर्वी, सिधीचे जिल्हाधिकारी आणि एसपींनीही घटनास्थळाची पाहणी केली. खासदार रीती पाठकही घटनास्थळी पोहोचल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते कमलनाथ, अजय सिंह यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *