• Wed. Apr 30th, 2025

नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा:विदर्भातल्या दोन डझन नेत्यांचे काँग्रेस निरीक्षकांना साकडे

Byjantaadmin

Feb 24, 2023

सत्यजित तांबे यांचे बंड आणि बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीचे प्रकरण थंडावण्यापूर्वीच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा धुसफूस सुरू झालेली पाहायला मिळते आहे. आता नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून ​​हटवा, अशी मागणी विदर्भातल्या 24 नेत्यांनी केल्याचे समोर आले आहे.

काँग्रेसचे निरीक्षक रमेश चेन्निथला यांची या नेत्यांनी भेट घेतली. त्यांच्याकडे पटोले यांना हटवा आणि शिवाजीराव मोघे यांना प्रदेशाध्यक्ष करा, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नाही, याची चर्चा सुरू झाली आहे.

हायकमांडला भेटणार

काँग्रेस निरीक्षक रमेश चेन्निथला यांची मुंबईत विदर्भातल्या नेत्यांनी भेट घेतली. यावेळी काँग्रेस समितीचे सचिव रहमान खान नायडू, सदस्य प्रदेश काँग्रेस कमिटी प्रकाश मुगदीया, इक्राम हुसैन, सरदार महेंद्र सिंह सलूजा यांच्यासह जवळपास दोन डझन पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी यावेळी पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा, अशी मागणी केली. तसेच हीच मागणी रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेस अधिवेशनात हायकमांडकडे करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केल्याचे समजते.

कशासाठी केली मागणी?

नाना पटोले यांचा मनमानी कारभार सुरू आहे. ते कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांच्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजी वाढली आहे. नाना पटोले यांनी काँग्रेसच्या व्होटबँकेला पक्षापासून दूर ठेवले आहे. दलित, मुस्लीम यांना दूर लोटण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना हटवा, अशी मागणी शिवाजीराव मोघे यांच्या समर्थकांनी काँग्रेस निरीक्षक रमेश चेन्निथला यांच्याकडे केली आहे. ते आता काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे.

पुन्हा गटबाजी समोर

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा धुसफूस सुरू झाल्याचे समोर येत आहे. यापूर्वी विधान परिषद निवडणुकीत नाशिकच्या तिकीट वाटपावरून घोळ घालण्यात आला. त्यामुळे सत्यजित तांबे या तरुण नेत्याने बंड केले. ते पक्षाच्या पाठिंब्याशिवाय निवडून आले. त्यानंतर त्यांनी थेट नाना पटोले यांच्याविरोधात एक पत्रकार परिषद घेत जोरदार आरोप करत त्यांना तिकीट वाटप घोळाला जबाबदार धरले. बाळासाहेब थोरातही याच दरम्यान नाराज होते. हे प्रकरण संपते न संपते तोच नाना पटोले यांच्याविरोधात पुन्हा एक गट आक्रमक झाला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत धुसफूस काही केल्या कमी होताना दिसत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed