‘नारायण राणे यांना बाईन पाडलं… बाईनं’ या शब्दांमध्ये कोटी करत अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. अजित पवार यांनी शेलक्या भाषेत केलेल्या या टीकेवर भलतेच खूश झालेल्या संजय राऊत यांनी अजित दादांचे तोंडभरून कौतुक केले आहे. दादा म्हणजे कमाल की चीज आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी आपला आनंद व्यक्त केला.
अजित पवार म्हणाले, आत्तापर्यंत शिवसेना फोडणाऱ्यांचा विजय झालेला नाही. त्यांना जनतेने जागा दाखवलेली आहे. भुजबळांसहीत सगळ्यांना पाडण्याचे काम केले. नारायण राणेंना तर दोनदा पाडले. एकदा कोकणात आणि दुसऱ्यांदा मुंबईत वांद्रत एका महिलेने पाडले. बाईने पाडले बाईने, असे म्हणत अजित पवार यांनी राणेंना डिवचण्याचा प्रयत्न केला.
काय म्हटले ट्विटमध्ये?
खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. ‘दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र’ असे ट्विट करत संजय राऊत यांनी अजित पवार यांची तोंडभरून स्तुती केली आहे.
यामुळे कौतुकांचे पूल
नारायण राणे यांनी आत्तापर्यंत अनेकदा संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. दोन्ही नेत्यांमधील वाद सर्वश्रुत आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत राणेंचा समाचार घेतल्याने संजय राऊत यांच्याकडून अजित पवारांचे कौतुक करण्यात आले.