बीड जिल्ह्यातील शेकडो ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया झाल्याचा प्रकार समोर आल्याने मराठवाड्यात गेल्या वर्षी खळबळ उडाली होती. दरम्यान आता याच मराठवाड्यात गेल्या 20 दिवसात तीन अवैध गर्भपाताच्या घटना समोर आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या तीन घटनांमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना औरंगाबादच्या चित्तेगावमध्ये उघडकीस आली तर, दुसरी घटना जालना आणि पुन्हा एकदा तिसरी घटना आता औरंगाबादच्या जटवाड्यामध्ये समोर आली आहे.
औरंगाबाद शहरातील जटवाडा रोडवरील होनाजीनगरात एका फ्लॅटमध्येच अवैध गर्भपात केंद्र चालविले जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. आधीच्या दोन मुली असताना केवळ मुलाच्या हव्यासापोटी तिसऱ्यांदा गर्भवती राहिलेल्या महिलेचा या ठिकाणी गर्भपात केला आणि त्यानंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. 12 ऑक्टोबर 2022 रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सविरुद्ध आता 22 फेब्रुवारीला बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर डॉक्टर शाम जैस्वाल आणि नर्स सविता सोमनाथ थोरात, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर तारा सुनील शेळके (रा. धोपटेश्वर, ता. औरंगाबाद) असे मृत महिलेचे नाव आहे.
वीस दिवसांत तिसरी घटना!
जटवाडा रोडवरील होनाजीनगरात एका फ्लॅटमध्येच अवैध गर्भपात केंद्र चालविले जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वीस दिवसातील ही मराठवाड्यातील तिसरी घटना आहे. यापूर्वी औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील चितेगाव येथे 5 फेब्रुवारी रोजी एका डॉक्टर दाम्पत्याने महिलेचा गर्भपात केल्याची घटना समोर आली होती. ज्यात महिलेला रक्तस्त्राव सुरु झाल्याने तिची प्रकृती खालावली म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि हे सगळे प्रकरण बाहेर आलं होतं. तर याप्रकरणी डॉक्टर दाम्पत्य डॉ. अमोल जाधव आणि डॉ. सोनाली उद्धव काळकुंबे-जाधव यांच्यावर बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी अजूनही फरार आहेत.
जालन्यातही गर्भपाताची घटना!
औरंगाबादच्या चित्तेगाव येथील घटना ताजी असतानाच त्यानंतर जालन्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील एका विवाहितेचा अवैध गर्भपात करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. महिलेचा अवैध गर्भपात केल्यावर तिला रक्तस्राव सुरु झाल्याने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता. विशेष म्हणजे खाजगी डॉक्टरांनी अधिकृत परवानगी घेऊन महिलेवर तात्काळ उपचार केल्याने तिचा जीव वाचवण्यात यश आले होते. तर या प्रकरणी बदनापूर तालुक्यातील एक डॉक्टर, डॉक्टरचा मित्र आणि गर्भपात करणारा डॉक्टर अशा चार आरोपींविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात अवैध गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.