पुणे: कसबा पोटनिवडणुकीच्या काळात जाणीवपूर्वक ब्राह्मण समाज नाराज असल्याचे नरेटिव्ह रचण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, हा गिरीश बापटांनी बांधलेला मतदारसंघ आहे. कोणीही कितीही नरेटिव्ह रचले तरी कसब्यातील हिंदुत्त्ववादी मतदार त्याला भीक घालणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते गुरुवारी हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत बोलत होते. या प्रचारसभेत फडणवीसांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला
ही निवडणुक जरी कसब्यातली असली तरी, आता ही लढाई वैचारिक झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कसबा मतदारसंघ भाजपकडे आहे, हा मतदारसंघ गिरीश बापट यांनी बांधला आहे. पोटनिवडणुकीच्या काळात कसब्यात वेगवेगळे अजेंडे राबवण्यात आले. मुक्ता टिळक यांचे कुटुंबीय आणि ब्राह्मण समाज नाराज असल्याचा प्रचार करण्यात आला. पण कसबा हा हिंदुत्ववाद्यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे कोणी कितीही पद्धतीने नरेटिव्ह रचण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फरक पडणार नाही. ही लढाई हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी नाही, तर वैचारिक लढाई आहे. ३७० कलम समर्थक आणि ३७० कलम विरोधक यांच्यातली ही लढाई आहे. आम्ही छत्रपतींचा विचार सांगणारे लोक आहोत. आंबेडकर आणि फुलेंचा विचार सांगणारे लोक आहोत. या ठिकाणी भाजपचाच उमेदवार निवडून येईल, काँग्रेसचा पराभव होईल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अंथरुणाला खिळलेल्या गिरीश बापटांना प्रचारात उतरवल्याने फडणवीसांवर टीका
काही दिवसांपूर्वी गिरीश बापट हे केसरीवाडा येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सहभागी झाले होते. त्यांची प्रकृती फारशी चांगली नसतानाही ते याठिकाणी आले होते. यावेळी बोलताना गिरीश बापट यांना धाप लागत होती. या सगळ्या प्रकारामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. गिरीश बापट यांची प्रकृती इतकी गंभीर असतानाही त्यांना केवळ मतांसाठी प्रचाराला जुंपण्यात आले, असा आरोप विरोधकांनी केला होता. फडणवीसांनी गिरीश बापट यांना बाहेरच्या हवेत श्वास घेताना त्रास होत असतानाही त्यांना प्रचारात उतरवले. देवेंद्र फडणवीस आणि माणुसकीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. त्यांना काळीज असण्याचा प्रश्नच नाही, अशी खरमरीत टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली होती.