मुंबई महानगरपालिका निवडणुकीची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमिन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्रातील 12 टक्के मुस्लिम लोकांवर लक्ष केंद्रित केले आहे. ओवैसी यांनी 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथे आपल्या पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले आहे. त्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी पक्ष तसेच शिवसेनेच्या छावणीत खळबळ उडाली आहे.
असदुद्दीन ओवेसी यांच्या अधिवेशनामुळे महाविकास आघाडीच्या छावणीत जो गोंधळ उडाला आहे, त्याचे प्रमुख कारण म्हणजे मुस्लिम बहुल जागांवर एमआयएमचे लक्ष आहे. ते 25 फेब्रुवारीला मुंब्य्रात रॅली घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी ते मालाड येथील मालवणी येथे सभा घेणार आहेत.
हिंदू मतदारांचे ध्रुवीकरण
विशेष म्हणजे मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) आणि मालाड विधानसभा मतदारसंघातून अस्लम शेख (काँग्रेस) आमदार आहेत. असदुद्दीन ओवेसी सक्रिय झाल्यामुळे मुस्लिम मतांचे विभाजन होण्याची भीती महाविकास आघाडीला सतावत आहे. ओवेसी प्रक्षोभक भाषण देतील, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे हिंदू मतदारांचे ध्रुवीकरण होईल आणि आघाडीला फटका बसेल.
महाराष्ट्रात एमआयएमकडे आहे 1.34 टक्के मत
2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमला एकूण 1.34 टक्के म्हणजेच 7,37,888 मते मिळाली होती. या निवडणुकीत त्यांचे दोन आमदार विजयी झाले, तर 35 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने महाराष्ट्रात 44 जागांवर उमेदवार उभे केले होते.
जाहिरातीवर 2.36 लाख रुपये खर्च
या निवडणुकीत एमआयएमने जाहिरातीवर सुमारे 2.36 लाख रुपये खर्च केले होते. याशिवाय असदुद्दीन ओवेसी यांच्या सभांमध्ये वापरण्यात आलेल्या हेलिकॉप्टरवर सुमारे 24.78 लाख रुपये खर्च करण्यात आले. त्याचप्रमाणे, एमआयएमने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार साहित्यासह इतर गोष्टींवर 27.14 लाख रुपये खर्च केले होते.