• Wed. Apr 30th, 2025

….पण जनतेच्या नशिबी लादली फक्त महागाई, ‘मोदीनॉमिक्स’चे ढोल जगभर पिटले

Byjantaadmin

Feb 24, 2023

महागाईचा युक्रेन युद्धाशी फारसा संबंध नाही. जो संबंध आहे तो केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा आहे. जगात महागाई, तेव्हा आपल्याकडेही महागाई, पण जगात स्वस्ताई तरीही आपल्याकडे महागाईच! ही मोदी राजवटीचीच ”देणगी’ म्हणायला हवी. आठ वर्षांपूर्वी महागाईच्या नावाने काँग्रेसविरोधात ठणाणा करीत जे सत्तेत बसले त्यांनीही ‘दरवाढीची ‘वात’ आणि महागाईचे ‘दिवे’ लावण्याशिवाय दुसरे काय केले? असा सवाल आजच्या सामनातून करण्यात आला आहे.

वादे आणि दावे तर खूप केले, पण जनतेच्या नशिबी ना स्वस्ताई ना दुहाई, लादली ती फक्त महागाईच! ‘मोदीनॉमिक्स’चे ढोल जगभर पिटणारा सत्ताधारी पक्ष आणि अंधभक्त यांचे या ‘जगात स्वस्ताई, भारतात महागाई’ या उफराट्या समीकरणावर काय म्हणणे आहे? महागाईचा असाही ‘चमत्कार’ फक्त मोदीच करू शकतात असेच कदाचित ते म्हणतील आणि स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतील! अशाप्रकारची टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर करण्यात आली आहे.

आजच्या सामनात म्हटले आहे, मे महागाई कमी झाल्याचे ढोल सत्ताधारी मंडळी येता-जाता पिटत असतात. त्यासाठी कधी कागदी घोडे तर कधी कागदोपत्री आकडे नाचवीत असतात. अर्थात महागाईसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या मात्र सत्ताधाऱ्यांचे ढोल फोडणाऱ्या आणि कागदी घोडय़ांना लगाम घालणाऱ्या आहेत.

बळीराजाचे बजेट कोलमडले

सामनात म्हटले आहे, गॅस, खाद्यतेल, कापूस, कॉफी-चहा आदी रोजच्या जीवनात आवश्यक 10 पदार्थांचे भाव दुपटीने वाढले आहेत. खतांच्या किमतीही दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे आधीच निसर्गाच्या लहरीने हवालदिल झालेल्या बळीराजाचे बजेट कोलमडले आहे. वास्तविक, या सर्व वस्तूंचे दर जागतिक बाजारात थोडेथोडके नाही, तर तब्बल 48 टक्क्यांनी कमी झाले आहेत आणि भारतात काय स्थिती आहे? युरिया हे खत शेती आणि शेतकन्यांसाठी एक अत्यावश्यक गोष्ट त्याचे भाव जगात 47.6 टक्क्यांनी कमी झाले. भारतात मात्र ते 5.2 टक्क्यांनी वाढले आहेत.

पेट्रोल-डिझेल ‘शंभरी’ पार

सामनात म्हटले आहे, पेट्रोल-डिझेलबाबत तरी वेगळी काय स्थिती आहे? जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या तरी आपल्या देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढच होत असते. स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर ‘एक हजारी मनसबदार’ बनते तर पेट्रोल-डिझेल ‘शंभरी’ पार करते! मुळात देशांतर्गत इंधन दर जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार कमी-जास्त होणे अपेक्षित आहे. मात्र मोदी सरकारच्या काळात हे ‘समीकरण’ ही खुंटीला टांगून ठेवले गेले आहे.

सामान्यांचा खिसा रिकामा

सामनात म्हटले आहे, सरकारी तिजोरी ‘पेट्रोडॉलर्स’ ने भरलेली याला मोदी सरकार ‘अर्थशास्त्र’ म्हणत असले तरी सर्वसामान्यांसाठी ते “अनर्थशास्त्र’च ठरले आहे. कारण जगातील स्वस्ताईचा थोडाफारही लाभ सर्वसामान्यांच्या खिशात पडलेला नाही. जगात अनेक वस्तू स्वस्त होऊनही आपल्याकडे महागच झाल्या आहेत. एरव्ही महागाईबाबत आपले राज्यकर्ते युक्रेन युद्धाकडे बोट दाखवतात. हे युद्ध तर सुरूच आहे. तरीही जगातील महागाई कशी कमी झाली? असा सवालही ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *