संजय राऊत यांच्याविरोधात नाशिक, ठाण्यानंतर आता बीड शहरातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
संजय राऊत यांच्याविरोधात 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संजय राऊत यांच्या विरोधात ठाण्यात शिवसेना महिला आघडीकडून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ठाण्यातही अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. संजय राऊत यांच्यावर आता बीडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
आपण घाबरणार नाही
निवडणुक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. निवडणुक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. आता हेच प्रकरण त्यांच्या अंगलट आले आहे. मात्र अशा कितीही केसेस झाल्या तरी आपण घाबरणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.
शहा-राऊत यांच्या वक्तव्याने वादाला तोंड
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात असताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमित शहा म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले. अमित शहा यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचे ढोंग आहे. ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला न्याय देत आहेत. अशाप्रकारची टीका संजय राऊत यांनी केली होती.