काँग्रेस नेते पवन खेरा यांना आसाम पोलिसांनी दिल्ली विमानतळावर अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यासंदर्भात दाखल तक्रारीची दखल घेत आसाम पोलिसांनी दिल्ली विमानतळावर त्यांना अटक केली. मात्र, यावर थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पवन खेरांना अंतरिम जामीन देण्याचे निर्देश दिल्ली न्यायदंडाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, या प्रकरणामुळे काँग्रेस विरुद्ध भाजपा असा कलगीतुरा सुरू झाला असून काँग्रेसनं आता मोदींचे काही जुने व्हिडीओ ट्वीट करत खोचक सवाल केला आहे.
नेमकं झालं काय?
काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचा उल्लेख दामोदरदासऐवजी गौतमदास असा केला. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर आपल्याकडून चुकून हे विधान बोललं गेल्याचं सांगत खेरा यांनी माफीही मागितली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात तातडीच्या सुनावणीची मागणी केल्यानंतर त्यावर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांना अंतरीम जामीन देण्याचे निर्देश दिले.