• Fri. Aug 8th, 2025

MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य, नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार

Byjantaadmin

Feb 23, 2023

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करून माहिती दिली.

एमपीएससीच्या नवीन शैक्षणिक पॅटर्ननुसार यंदाच्या वर्षापासून परीक्षा घेण्यास विद्यार्थ्यांनी विरोध करत पुण्यात आंदोलन सुरू केले. वेळोवेळी आंदोलन करूनही सरकारने दखल न घेतल्याने सोमवारी सकाळपासून बालगंधर्व चौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आश्वासनानंतरही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही. अखेर आज या विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले आहे.

शरद पवार यांनी घेतली होती भेट

काल रात्री साडेअकरा वाजता विद्यार्थी आंदोलकांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोग, विद्यार्थी प्रतिनिधींची घेण्याचे ठरले होते. ही बैठक आज नियोजित होती. मात्र बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता बैठक न घेता आयोगाने आज विद्यार्थ्यांच्या बाजुने निर्णय दिला आहे.

आयोग स्वायत्त आहे

लोकसेवा आयोगाच्या निर्णयावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, जी काही परिस्थिती निर्णाण झाली होती. त्याबाबत आयोगासोबत चर्चा केली होती. यात आम्हाला कुठलेही राजकीय श्रेय घ्यायचे नाही. ‘एमपीएससी’बाबतचा जुना निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला होता. त्याचे खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा हिताचा निर्णय आता आयोगाने घेतला आहे. कोणी येणार, जाणार त्यानुसार निर्णय घेतले जात नाही. आयोग स्वायत्त आहे. त्यांनी हा निर्णय घेतला.

निवडणुकीचा रंग देऊ नका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना टिळकांच्या घरी यायला विषय लागतो का? असा प्रति सवाल उपस्थित केला. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी दिलेल्या भेटीविषयी होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. गणेशमंडळांच्या भेटींबाबत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री आला कि, लोक भेटायला येतात. त्याला निवडणुकीचा रंग देऊ नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *