• Fri. Aug 8th, 2025

श्री सिध्देश्वर कृषि महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Byjantaadmin

Feb 23, 2023

श्री सिध्देश्वर कृषि महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

  • 25 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान आयोजन
  • जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

लातूर, दि. 23, (जिमाका): कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने 25 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 दरम्यान श्री सिद्धेश्वर कृषि महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. श्री सिद्धेश्वर मंदिर येथील विलासराव देशमुख यात्री निवास हॉलमध्ये होणाऱ्या या कृषि महोत्सवात चर्चासत्र, परिसंवाद, कृषि प्रदर्शनाचे आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

श्री सिद्धेश्वर कृषि महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (दि. 25) सकाळी अकराला होणार असून दुपारी दोनला पशुपालन या विषयवार परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. नितीन मोहन मार्केंडेय यांचे व्याख्यान होईल. दुपारी चारला महाराष्ट्राची लोककला भारुड होणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. 26) सकाळी अकराला सेंद्रिय शेती विषयावर रेसिड्यू फ्री अॅण्ड ऑरगॅनिक फार्मिंग इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत नाईकवादुई यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर दुपारी दोनला नैसर्गिक फळशेती करणारे प्रगतशील शेतकरी वासुदेव गायकवाड हे नैसर्गिक शेती या विषयावर मार्गदर्शन करतील. दुपारी चारला लोकगीतांचा कार्यक्रम होईल.

सोमवारी (दि. 27) सकाळी अकराला कृषि पायाभूत सुविधा निधी, मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामपरिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), प्रधामंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्येयन योजना या विषयवार कृषि पायाभूत सुविधा योजनेचे राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी बारा वाजता नांदेड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे अॅग्री ऑफिसर किरण चांदुरकर हे भारतीय स्टेट बँकेच्या विविध योजना याविषयी माहिती देतील. दुपारी दोनला इंदौर येथील हरीधारा कृषि सेवा समितीचे मारुती माने हे नैसर्गिक शेती विषयावर मार्गदर्शन करतील.

मंगळवार, 28 फेब्रुवारी रोजी सकाळी अकराला कृषिरत्न, कृषिभूषण आदी पुरस्काराने सन्मानित डॉ. संजीव माने हे ऊस लागवड तंत्रज्ञान या विषयावर माहिती देतील. दुपारी दोनला सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी सांगली येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन होईल. दुपारी चारला महत्मा फुले कृषि विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. तुळशीराम बास्टेवाड हे कृषि यांत्रिकीकरणाच्या नवीन दिशा याविषयी मार्गदर्शन करतील. बुधवारी (दि. 1) शेतकरी सन्मान समारंभ व कृषि महोत्सवाचा समारोप होईल, अशी माहिती ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *