केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेनेचे अधिकृत ट्विटर हँडलचे ‘ब्लू टिक’ गेले आहे. दुसरीकडे शिवसेनेची अधिकृत वेबसाईटही बंद पडल्याचे पहायला मिळत आहे.
शिवसेना नाव व चिन्ह गेल्याने अधिकृत सोशल मिडीया अकाऊंटवर मोठे बदल करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गट येत्या काळात वेबसाईटच्या नावाबाबत बदल करणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा पक्षनावावरील दावा संपला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने त्यांच्या ट्विटर हँडलचे नाव बदलून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे केले. शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरील नाव बदलल्याने ट्विटरच्या नियमांनुसार ठाकरे गटाला ब्लू टिकसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल.

ब्लू टिक का गेलं?
ट्विटरच्या नियमांनुसार कोणतेही हँडल अधिकृत आहे की नाही हे तपासले जाते व त्यानंतर त्याला ब्लू टिक देण्यात येते. एकदा ब्लू टिक मिळाल्यानंतर काही बदल खातेदाराला कधीही करता येतात. त्याचा ब्लू टिकवर कोणताही परिणाम होत नाही. मात्र, अधिकृत झालेल्या आणि ब्लू टिक मिळालेल्या खात्याचे हँडल नेम बदलले तर ट्विटर संबंधित खात्याचे ब्लू टिक काढते. त्यामुळे पुन्हा ब्लू टिक हवे मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो