भाजप पक्षात आजचा कार्यकर्ता उद्याचा नेता होवू शकतो – संजय केणेकर
पक्ष वाढवणारे कार्यकर्ते मोठे झाले पाहिजेत – संजय केणेकर
औशात भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न
औसा – भाजप पक्षातच आजचा कार्यकर्ता उद्याचा नेता होवू शकतो त्यामुळे कार्यकर्ते आपल्या कामातून भूमिकेतून जनतेच्या मनात किती रुजतात हे महत्वाचे असून पक्ष वाढत असताना कार्यकर्त्यांला ताकद देणे आवश्यक आहे.ज्या कार्यकर्तेमुळे पक्ष वाढतो तो कार्यकर्ता उभा करण्याची भूमिका ठेवली पाहिजे असे मत भाजप मराठवाडा महामंत्री संजय केणेकर यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पक्ष लातूर जिल्हा कार्यकारिणी यांच्या (दि.१७) रोजी विजय मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आ. रमेश कराड, माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, खासदार सुधाकर श्रंगारे, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार विनायकराव पाटील, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार बब्रुवान खंदारे,भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरविंद पाटील निलंगेकर, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश सरचिटणीस संजय दोरवे, दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, नगरपरिषदेचे गटनेते सुनील उटगे, शहराध्यक्ष लहू कांबळे,कल्पना डांंगे आदीसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी संजय केणेकर पुढे म्हणाले की भाजप पक्षात कार्यकर्त्यांचे महत्त्व अधिक असून कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे हि पक्षाची भूमिका आहे.काही कामा उणीवा असतील तर त्या बाजारात न मांडता काही ठराविक कार्यकर्त्यांसमोर मांडत असताना पक्षातील चांगल्या कामाचा ऊहापोह लोकांमध्ये जाऊन करा असा सल्ला त्यांनी या जिल्हा कार्यकारिणीची बैठकीत देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने छत्रपती संभाजी नगर व धाराशिव असे नामकरण केल्याबद्दल अभिनंदन करीत छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते अशी भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिले गेली असे सांगून महाविकास आघाडीवर यावेळी बोलताना केणेकर यांनी टिका केली.
यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने काम करणे आवश्यक असून भाजप च्या नेतृत्वाखाली संपुर्ण लातूर जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतीसह विविध प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. या बैठकीचे सुत्रसंचालन दिपक चाबुकस्वार यांनी केले.
शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनेला भरीव निधीची तरतूद – आ. अभिमन्यू पवार
३३ महिन्याच्या काळात महाविकास आघाडी सरकारने एकही शेतकरी हिताचा निर्णय घेतला नाही. उलट शेतकऱ्यांच्या दुष्टीने महत्त्वाच्या आशा अनेक योजना बंद करून शेतकर्यांना धोका दिला सुडबुध्दीने राजकारण केलेल्या ठाकरे सरकारने सुडबुध्दीने शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना बंद केल्या. आता राज्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना १ हजार २४९ कोटींची भरीव निधी दिला. लातुर जिल्ह्य़ातील गोगलगाय प्रादुर्भावसह अतिवृष्टी व संततधार पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करुन आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक ४२० कोटींची मदत केली. शेतकऱ्यांना उच्च दाबाने वीजपुरवठा व्हावा यासाठी ४ हजार मेगावॉट वीज निर्मितीचा उद्देश ठेवून काम करीत आहे. साखर उद्योगांन स्थिरता यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीयमंत्री अमित शाहा यांनी अनेक चांगले निर्णय घेऊन साखरेला स्थीर भाव दिला. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. याबरोबरच पेट्रोल व डिझेल मध्ये पंचवीस टक्के इथेनॉल वापरले जाण्याचा निर्णयामुळे इथेनॉल उत्पादनाला चालना मिळाली आहे. असे सांगून सध्याच्या सरकारने पाणलोट च्या योजनेतून सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी भरीव निधीची तरतूद करीत शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीच्या दुष्टीने विविध विकासाच्या योजना सुरू केल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
ठाकरे सरकारच्या काळात राज्याचा विकास खुंटला – संभाजी पाटील निलंगेकर
महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्र सरकारच्या विविध योजना राज्यात राबविण्यासाठी जाणीवपूर्वक बगल देण्यात आली. त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यातील रोजगार व गुंतवणूक घटली. राज्याला मागे घेऊन जाण्याचे काम त्या अडीच वर्षांत झाले असून त्यावेळी जाणीवपूर्वक भाजप आमदारांच्या विकास निधीला कात्री लावण्यात आली. असे सांगून राज्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबविणे सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील विकास कामांना गती वाढली आहे. असे बोलून मराठवाडा दुष्काळमुक्त करणारी वाॅटर ग्रीड योजनेला स्थगिती देणाऱ्या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध ठराव तर राज्यात आपले सरकार आल्यानंतर वाॅटर ग्रीड योजनेतून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी भरीव निधी देणार असल्याची घोषणा करणाऱ्या या सरकारच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला.
