• Tue. Apr 29th, 2025

निवडणूक आयोगाची ठाकरे गटाला बाजू मांडण्यासाठी उद्यापर्यंतची मुदत, अंधेरी पोटनिवडणुकीआधी फैसल्याची शक्यता

Byjantaadmin

Oct 4, 2022

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना 5 ऑक्टोबरपर्यंत आपली बाजू मांडण्याची वेळ दिली आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठाकरे गटाला आपली बाजू मांडावी लागणार आहे. लवकरच अंधेरीची पोटनिवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच धनुष्यबाण कुणाचे याचा फैसला होण्याची शक्यता आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीआधी शिवसेनेचा फैसला?

खरी शिवसेना कोणाची यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होणार आहे. यामुळे शिवसेना संघटनेत दोन तृतीयांश फूट असल्याचे दाखवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट सर्व प्रयत्न करणार आहे. ही कायदेशीर लढाई लढण्यासाठी त्यांनी 130 बड्या वकिलांची फौज नेमली आहे. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाला आपली बाजू मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 5 ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे ही अंधेरी पोटनिवडणुकीआधीच खरी शिवसेना कोणाची याचा निकाला लागणार आहे

शिंदे गटाची 130 वकिलांची फौज

130 वकिलांच्या फौजेत मुकुल रोहतगी, नीरज कौल, अरविंद दातार, माजी महाधिवक्ता डायरस खंबाटा यांसारख्या ज्येष्ठ वरिष्ठ वकिलांसह सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उदय लळित यांचे पुत्र वकिल श्रीयांश लळित यांनाही ठेवण्यात आले आहे.

शिंदे गटाच्या या पहिल्या रणनीतीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही तयारी सुरू केली आहे. 40 आमदार आणि 12 खासदारांची बंडखोरी होऊनही शिवसेना संघटनेत दोन तृतीयांश फूट नाही. हे निवडणूक आयोगात सिद्ध करण्यासाठी शिवसेनेकडून रणनीती आखण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते आमदार सचिन अहिर यांनी नुकतीच दिली होती.

विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि तेथील पदाधिकाऱ्यांकडून घेतलेली प्रतिज्ञापत्रे आयोगासमोर सादर केली जातील. महाराष्ट्रातूनही गटप्रमुखांपासून नेतेपदापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे सादर केली जातील. यावरून शिवसेना संघटनेतील दोन तृतीयांशहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सिद्ध होईल. या प्रकाराची माहिती शिवसेना भवनशी संबंधित एका विश्वसनीय सूत्राने दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed