मुंबई:-२०१९ मध्ये अंधेरी पूर्व मतदारसंघात युती असतानाही शिवसेनेच्या रमेश लटके यांच्याविरोधात बंडखोरी करून सुमारे ४५ हजार मते घेणाऱ्या मुरजी पटेल यांना भाजपने पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. १५ ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. ३ नाेव्हेंबर रोजी मतदान होईल. ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.
सोमवारी निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर केली. त्यानंतर भाजप आणि उद्धव ठाकरे गट कामाला लागले आहेत. भाजपकडून मुरजी पटेल तर सेनेकडून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि उद्धव ठाकरे यांना मुंबई मनपा डोळ्यासमोर ठेवून आपली शक्ती दाखवण्याची संधी आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्यामागे आपली शक्ती उभी करणार असल्याचे शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात सांगितले. मात्र, काँग्रेसची अजून भूमिका ठरली नसली तरी आघाडी म्हणून सेना उमेदवाराला पाठिंबा देऊ शकते.
भाजपने सेनेविरुद्ध दिले होते ४० बंडखोर भाजपच्या उमेदवाराचे नाव जाहीर होताच शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला आहे. २०१९ मध्ये भाजपने युतीधर्माचे पालन केले नाही. ४० जागांवर विरोधात बंडखोर उमेदवार दिले. अंधेरी पूर्व मतदारसंघातून बंडखोर मुरजी पटेल यांना उमेदवारी देऊन भाजपने शिवसेनेचा आरोप खरा ठरवला आहे.
सुषमा अंधारे, प्रवक्त्या, शिवसेना
स्थानिकांचा पटेल यांना पाठिंबा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी मुरजी पटेल यांना स्थानिकांचा मोठा पाठिंबा आम्हाला दिसला आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार पटेल यांना यश मिळवून देण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही.- आशिष शेलार, भाजप, मुंबई अध्यक्ष
2019 निवडणूक निकाल भाजप, सेनेची होती युती रमेश लटके । शिवसेना 62,680 मुरजी पटेल । भाजप बंडखोर 45,788 आमिन कुट्टी । काँग्रेस 27,951
चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात शिवसेनेचा शिंदे गट व ठाकरे गट यांच्यातील धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या नामांकनापूर्वी या दोघांतील वादावर आयोग काही निर्णय घेतो का, याकडे ठाकरेंसह शिंदे गटाचे लक्ष लागले आहे.
शिंदे गटाची जागा भाजपने खेचली अंधेरी पूर्व हा मतदारसंघ युतीत सेनेकडे आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी या जागेवर दावा सांगणे अपेक्षित होते. मात्र, शिंदे गटाची ही जागा भाजपने खेचली आहे. अलीकडे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याही मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. यामुळे सरनाईक शिंदेंत वाद झाल्याचे कळते.