पुणे: कसबा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. याचाच एक भाग म्हणून तब्येत व्यवस्थित नसूनही गिरीश बापट हे गुरुवारी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. केसरीवाडा येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला गिरीश बापट यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, यानंतर गिरीश बापट यांनी प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश बापट यांनी पत्रक काढून आपण कसब्याच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीसांच्या आग्रहाखातर गिरीश बापट यांनी केसरीवाडा येथील मेळाव्याला उपस्थिती लावली होती. परंतु, यामुळे गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्याने चिंता वाढली आहे
गिरीश बापट यांना सध्या आठवड्यातून दोनवेळा डायलिसिस करावे लागते. त्यामुळे बापट सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळतात. परंतु, काल त्यांनी पक्षासाठी कसब्याच्या प्रचारात सहभाग घेतला. मात्र, आज लगेच त्याचा परिणाम झाला असून गिरीश बापट यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे गिरीश बापट यांना तातडीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष गिरीश बापट यांच्या प्रकृतीकडे लागले आहे. अद्याप डॉक्टरांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, आजचा प्रकार पाहता गिरीश बापट पुन्हा कसब्याच्या प्रचारात सहभागी होतील, ही शक्यता जवळपास मावळली आहे.
गिरीश बापट यांनी काल भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतही अजिबात चुरस नाही. भाजपचाच उमेदवार येथे विजयी होईल. फक्त थोडे अधिक कष्ट घेण्याची गरज आहे. त्याप्रमाणे काम करा, विजयाचे पेढे भरवायला मी स्वत: येईन, अशा शब्दांत गिरीश बापट यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला होता. आजारपणामुळे दीर्घकाळानंतर गिरीश बापट पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले. व्हीलचेअर, बोटाला ऑक्सिमीटर, नाकात नळ्या आणि सोबत ऑक्सिजन सिलिंडर अशा स्थितीत बापट यांना पाहून कार्यकर्त्यांना गहिवरून आले होते. यावेळी गिरीश बापटही भाषण करताना भावनावश झाले होते.