शेताच्या रेखांकन मंजुरीसाठी अंतिम शिफारस पुढे पाठविण्याकरिता 1 लाख 10 हजारांची लाच स्वीकारताना भंडाऱ्यातील लाखांदुर नगर पंचायतमधील तिघांना अटक झाली. नागपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी मध्यरात्री ही कारवाई केली.
स्थापत्य अभियंता गजानन मनोहर कराड (28), कनिष्ठ लिपीक विजय राजेश्वर करंडेकर (40), व खासगी वाहनचालक मुखरण लक्ष्मण देसाई (45) या तिघांना लाचप्रकरणी अटक केली आहे.
तक्रारदार प्रकाश यादवराव बोरकर (लाखांदूर) यांच्या मालकीची शेती आहे. त्यांनी शेतीचा विकास व छाननी शुल्क पावती व रेखांकन मंजुरीसाठी स्थानिक लाखांदूर नगरपंचायतला शिफारशीसाठी संपर्क केला.मात्र, काम करून देण्यासाठी 1 लाख 10 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली.
बोरकर यांनी याची तक्रार नागपूर येथील लाचलुचपत विभागाला दिली. त्यानुसार नागपुर येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत तब्बल 1 लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तिघांच्या विरोधात लाखांदूर पोलिसात कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1977 (संशोधन) सन 2018 अन्वये गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
यापूर्वी 4 फेब्रुवारी रोजी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी त्याच्याकडून 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपायाला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले होते. ओम कलेगुरवार, पोलीस शिपाई दिनेश गंगाधर गीरडे यांना रंगेहात पकडण्यात आले होते.याबाबत सावनेर तालुक्यातील खापा येथील 38 वर्षाच्या व्यक्तीने नागपूर एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांच्यावर खापा पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ओम कलेगुरवार यांचेकडे होता. या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक करायची नसेल आणि गुन्ह्यात पीसीआर घ्यायचा नसेल आणि गाडी जप्त करायची नसेल तर 40 हजार रुपयांची लाच मागितली.अखेरीस कलेगुरवार आणि पलीस शिपाई दिनेश गीरडे यांनी 35 हजार रुपये लाच मागितली होती.