हरियाणातील भिवानी येथील लोहारू शहरात बोलेरोमध्ये जिवंत जाळण्यात आलेल्या दोन मुस्लिम तरुणांना आधी पोलिसांनी पकडले होते. हरियाणातील फिरोजपूर झिरका येथील क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (सीआयए) पोलीस पथकाने जुनैद आणि नसीर यांना त्यांच्या बोलेरोला धडक देऊन पकडले होते.
यानंतर त्यांना अर्धमेल्या अवस्थेत बजरंग दलाच्या स्वाधीन केले. त्यांना बजरंग दलाच्या लोकांनी गोवंश तस्करीच्या संशयावरून बोलेरोसह जिवंत जाळले. जुनैद आणि नसीरच्या कुटुंबीयांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. संपूर्ण घटनेवेळी सीआयएची टीम बजरंग दलासोबत होती, असा कुटुंबाचा दावा आहे. दोघांनाही जबर मारहाण करण्यात आली होती.
मारहाणीनंतर बजरंग दलाने दोघांनाही पोलीस ठाण्यात नेले, मात्र त्यांची अवस्था पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना बोलेरोसह जिवंत जाळल्याची बातमी आली. दुसरीकडे, फिरोजपूर झिरकाचे सीआयए प्रभारी वीरेंद्र सिंह म्हणतात की, त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यांनी ना आरोपी पकडले, ना बजरंग दलाच्या ताब्यात दिले.
भावाच्या सासरवाडीला गेले होते दोघे
मृत जुनैदचा चुलत भाऊ इस्माईलने सांगितले की, जुनैद आणि नसीर भोरूबास सिक्री गावात आपल्या भावाच्या सासरवाडीला गेले होते. रात्री ते तिथेच राहिले. बुधवारी सकाळी लवकर घरी येत होते. वाटेत त्यांना सीआयए फिरोजपूर-झिरका आणि बजरंग दलाने अडवले. दोघांचीही नावे विचारली.
त्यानंतर दोघांनाही गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. बजरंग दलाच्या लोकांमुळे परिसरात आधीच घबराट पसरली आहे. यापूर्वी नूह येथे बजरंग दलाच्या सदस्यांनी केलेल्या कथित मारहाणीमुळे वारिसचा मृत्यू झाला होता. नासिर-जुनैद यांना खेचले जात असल्याचे दिसताच त्यांनी जीव वाचवण्यासाठी त्यांची बोलेरो कार पळवली.
IA-बजरंग दलावर गंभीर आरोप
जुनैद-नासीर बोलेरोमधून पळून जात असल्याचे पाहून फिरोजपूर-झिरका सीआयएने समोरून कारला धडक दिली आणि बजरंग दलाच्या लोकांनी मागून धडक दिली. या खून प्रकरणात पोलिसही तितकेच सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. याचे पुरावे गावकरी देत आहेत.
आमच्याकडे साक्षीदार आहेत. बिरुका चौत्रीकडे जाताना दोघांनाही कारमध्ये बसवून फिरोजपूर-झिरका पोलिस ठाण्यात नेण्यात आले. जिथे बजरंग दलाच्या लोकांनी दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांची प्रकृती इतकी बिघडली होती की पोलिसांनी त्यांना ठेवण्यास नकार दिला.
बजरंग दलाच्या मोनू मानेसरचे नाव आले समोर
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर बजरंग दलाचे सदस्य मोनू मानेसर, रिंकू सैनी फिरोजपूर-झिरका आणि इतर 7-8 जणांनी आमच्या दोन भावांना भिवानी येथे नेले आणि त्यांना मागच्या सीटवर बसवून जिवंत जाळले. दोघांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरल्यानंतर आम्हाला समजले. नंतर गाडीचे इंजिन व चेसीस नंबरवरून समजले की, ही आमची कार होती आणि मृत आमचे दोन भाऊ होते.
दोघेही राजस्थानचे रहिवासी
बोलेरो गाडीत मृतावस्थेत सापडलेले जुनैद (35) आणि नसीर (28) हे दोघेही हरियाणा सीमेला लागून असलेल्या राजस्थानच्या भरपूर जिल्ह्यातील घाटमिका गावचे रहिवासी आहेत. दोघांचे मृतदेह गुरुवारी भिवानी येथील लोहारू येथे निर्जनस्थळी बोलेरो गाडीत जळालेल्या अवस्थेत आढळून आले.
याप्रकरणी जुनैदचा चुलत भाऊ इस्माईल याने बुधवारी गोपाळगड पोलीस ठाण्यात (भरतपूर) दोघांवर अपहरण आणि प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता भिवानी आणि राजस्थानचे भरतपूर जिल्हा पोलीस तपासात गुंतले आहेत. दोघांच्या सांगाड्याचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यांना ओळखण्यासाठी डीएनए चाचणीसाठीही पाठवण्यात आले आहे.
वारिसच्या मृत्यूवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते
यापूर्वी 29 जानेवारी रोजी तावडू परिसरात वारिस नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यांची कार एका टेम्पोला धडकली, ज्यात वारिसचा मृत्यू झाला होता. नातेवाइकांनी मोनू मानेसर आणि त्याच्या साथीदारांवर हत्येचा आरोप केला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला.
वारिसच्या मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओदेखील समोर आला होता, ज्यामध्ये कथित गौरक्षक वारिस आणि त्याच्या साथीदारांना धमकीच्या स्वरात त्यांची नावे विचारताना दिसले होते आणि काही तासांनंतर वारिसचा मृत्यू झाला होता. आता जुनैद आणि नसीर यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा मोनू मानेसरचे नाव चर्चेत आले आहे.
मोनू मानेसर फरार
या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर मोनू मानेसर फरार झाला आहे. हरियाणातील गुडगाव जिल्ह्यातील मानेसर येथील रहिवासी असलेल्या मोहित ऊर्फ मोनू मानेसरला हरियाणातील बजरंग दलात गोसंरक्षण प्रमुख पद मिळाले आहे.
मोनू मानेसर आणि गो-तस्करांची दिल्ली-एनसीआर भागात अनेकदा आमने-सामने चकमक झाली आहे. या घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्याने व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून निश्चितपणे लिहिले आहे. त्याला जबरदस्तीने अडकवले जात असल्याचे तो सांगतो. घटनेच्या वेळी तो एका हॉटेलमध्ये होता. अलीकडेच एका गाय तस्कराने मोनू मानेसरला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा ऑडिओही व्हायरल झाला होता.