बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करच्या लग्नाचे फोटो गुरुवारी सोशल मीडियावर समोर आले आणि चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. समाजवादी पार्टीचा युवानेता फहाद अहमदशी स्वराने 6 जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केले. त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी दोघांनी गुपचुप साखरपुडा उरकला. ट्विटरवरुन लग्नाचा व्हिडिओ शेअर करत स्वराने चाहत्यांना ही बातमी दिली. विशेष म्हणजे नोंदणी पद्धतीने लग्न आणि साखरपुडा केल्यानंतर स्वरा आणि फहाद धुमधडाक्यातही लग्न करणार आहेत. आता स्वराची लगीनघाई सुरू आहे.
वरा आणि फहादच्या साखरपुड्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत स्वराने कॅप्शनमध्ये लिहिले, “कधीकधी तुम्ही ते जगभर शोधत असता जे तुमच्या अगदी शेजारी असते. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला आधी मैत्री सापडली. नंतर आम्हाला एकमेकांची जाणीव झाली. तुझे माझ्या आयुष्यात खूप स्वागत आहे फहाद अहमद.”
व्हिडिओमध्ये स्वराने कोर्ट मॅरेज आणि त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलताना लग्नाबाबतही माहिती दिली आहे. “आम्ही मार्चमध्ये लग्न करणार आहोत. पिक्चर अभी बाकी है,” असे स्वरा आणि फहाद व्हिडिओत म्हणत आहेत.
लिब्रिटींनी केला शुभेच्छांचा वर्षाव
स्वराने इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केल्यानंतर सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गौहर खान, सोनम कपूर, भावना सोमय्या, रेहा कपूर, रिचा चड्ढा, कोंकणा सेन शर्मासह अनेकांनी स्वरा आणि फहादला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गौहर खानने लिहले, “खूप खूप अभिनंदन स्वरा तुला भरपूर आनंद मिळो, तुझ्यामुळे मी खुश आहे.” अभिनेत्री सयानी गुप्तानेदेखील शुभेच्छा दिल्या आहेत. “वाह , तुम्हाला दोघांना शांती, सुख, हास्य आणि उत्तम वेळ मिळो. स्वरा तू यासाठी पात्र आहेस,” असे ती म्हणाली आहे.
अशी सुरु झाली दोघांची प्रेमकहाणी
स्वरा आणि फहादची पहिली भेट डिसेंबर 2019 मध्ये एका आंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तीन वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. फहाद एक सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याने सीएएविरोधी आंदोलनात सहभागी झाला होता. समाजवादी पार्टीचा तो युवा नेता आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे स्वरा भास्कर
34 वर्षीय स्वरा भास्करने 2010 मध्ये ‘गुजारिश’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2011 मध्ये आलेल्या ‘तनु वेड्स मनू’ या चित्रपटाने तिला ओळख मिळवून दिली. मिरांडा हाऊस, दिल्ली येथून ती पदवीधर आहे. तिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. स्वरा भास्कर शेवटची ‘जहां चार यार’ या चित्रपटात दिसली होती.