• Mon. Aug 18th, 2025

आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्याचे उद्घाटन

Byjantaadmin

Feb 17, 2023

आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्याचे उद्घाटन

किशोर वयापासून देशभक्ती ची प्रेरणा देणारा उपक्रम – आ. अभिमन्यू पवार

औसा – जिल्हा परिषद शिक्षण विभाग लातूर व लातूर भारत स्काऊट गाईड यांच्या संयुक्त विद्यमानाने (दि.१५) रोजी प्रतिभानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा मनोहरतांडा (ता.औसा) येथे आमदार अभिमन्यू पवार व लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते कब बुलबुल स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन समारंभ पार पडला.या उद्घाटनप्रसंगी आ. अभिमन्यू पवार यांनी किशोर वयापासून देशभक्तीची प्रेरणा देणारे हे मेळावे असून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना त्यामुळे वाव मिळतो एक सशक्त पिढी घडविण्यासाठी हे मेळावे प्रेरणादायी व आत्मनिर्भर भारतासाठी महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.

या जिल्हास्तरीय मेळाव्यास लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपसंचालक दिलीप राठोड, शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अनंत चव्हाण, स्काऊट गाईड संघटन आयुक्त डॉ. शंकर चामे, गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी, प्रशासन अधिकारी प्रमोद पवार, विस्तार अधिकारी बालाजी पोतदार, प्रतिभानिकेतनचे संचालक अंकुश देडे, मुख्याध्यापक नरसिंह गायकवाड,प्रा.सुधीर पोतदार, प्रवीण कोपरकर, दिपक क्षिरसागर आदीसह शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की स्काऊट गाईड च्या मेळाव्यातून एक संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम सुरू आहे.एका चांगला विद्यार्थी घडत असताना शिक्षकांबरोबर आई – वडीलांचीही जबाबदारी तितकीच महत्वाची आहे.आजचा विद्यार्थी उद्याचे भविष्य असून एक सशक्त पिढीसाठी हे मेळावे नक्कीच आवश्यक आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून मैदानी खेळ घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण होते.स्काऊट गाईड मेळाव्यातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागरुक केली जात असून असे मेळावे मोठ्या प्रमाणात घेतले जाणे आवश्यक असल्याचे सांगून विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या प्रत्यक्षीकाचे कौतुक यावेळी त्यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले की स्काऊट गाईडच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनचे धडे विद्यार्थी वयात शिकायला मिळतील. कोरोनानंतर स्काऊट गाईडचे महत्त्व अधिक वाढले आहे.या मेळाव्यातून शिस्तबद्ध व देशभक्त अशी पिढी घडू शकणार आहे. समुह काम कौशल्य शिकवणारा हा स्काऊटचा मेळावा असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना मोबाईल च्या बाहेरच्या जगात जगायला प्रेरणादायी मेळावा असल्याचे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *