सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावरील निर्णय ठेवला राखून
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील 5 सदस्यीय खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? आणि हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवण्याच्या मागणीवर आज शुक्रवारी सुप्रीम कोर्ट निकाल सुनावणार आहे.
नवनियुक्त राज्यपाल बैस यांचा शनिवारी शपथविधी
राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती राज्याच्या राजशिष्टाचार विभागातर्फे देण्यात आली आहे. नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी राजभवन येथील दरबार हॉलमध्ये दुपारी १२.४० वाजता आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा राजीनामा स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी रमैश बैस यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवली होती
अखेर उस्मानाबादचे नाव ‘धाराशीव’ साठी शिक्कामोर्तब
उस्मानाबादचं ‘धाराशिव’ असं नामकरण होणार असल्याची माहिती बुधवारी केंद्र सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. मात्र, औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ असं नामकरण करण्याबाबतची प्रक्रिया अद्याप विचाराधीन असल्याचेही केंद्र सरकारने म्हटलंय.. तर उस्मानाबादच्या नामकरणाचा शिंदे सरकारचा हा निर्णय राज्यघटनेतील संबंधित तरतुदींचं उल्लंघन आहे. तसंच हे दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केलेला आहे.
शिर्डीत नाईट लँडिंगचा परवाना प्राप्त
शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा सुरू झाली आहे. डीजीसीएकडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग, त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आणि त्यानंतर आता नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शिर्डीसाठी ही तिसरी आनंदाची बातमी आहे
आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणार आहे…
- आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना
- सत्तासंघर्षाची सुनावणी सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाण्याबाबत आज निर्णय
- नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे आज मुंबईत दाखल होणार
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर