पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत आपली जागा अडचणीत आल्याचे संकेत मिळाल्याने भाजपने अंथरुणाला खिळून असलेले पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना शेवटच्या टप्प्यात प्रचारात उतरवले. नाकात ऑक्सिजनची नळी लावून, व्हीलचेअरवर बसून त्यांनी बुधवारी केसरीवाड्यात झालेल्या बैठकीत मार्गदर्शन केले. बोलताना त्यांचे अंग थरथरत होते. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. मात्र भाजपने टिळकांच्या कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ब्राह्मण समाजात तीव्र नाराजी आहे. त्याचा फटका बसण्याची भीती भाजपला वाटतेय. महाविकास आघाडीतर्फे रवींद्र धंगेकर हे उमेदवार आहेत.
गिरीश बापट यांचे महत्त्व काय?
आजवर कसब्यात ब्राह्मणच आमदार निवडून आलेत. बापट यांनी सहा टर्म या भागाचे नेतृत्व केले. नंतर ते खासदार झाले. त्यांना मानणारा मोठा वर्ग इथे आहे. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे या वेळी प्रचारात येऊ शकत नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र ब्राह्मणांच्या नाराजीमुळे जागा संकटात येत असल्याचे पाहून देवेंद्र फडणवीसांनी बापटांची घरी जाऊन त्यांना गळ घातली. दुसऱ्या दिवशी बापट प्रचारात दिसले