• Tue. Apr 29th, 2025

सरकार शेतकऱ्यांना ‘गोगलगायी’च्या गतीनेच मदत देणार का? आमदार धिरज देशमुखांचा सवाल

Byjantaadmin

Oct 4, 2022

सरकार शेतकऱ्यांना ‘गोगलगायी’च्या गतीनेच मदत देणार का? आमदार धिरज देशमुखांचा सवाल

लातुर:-सध्या राज्यात पावसाचाजोर कमी झाला आहे. परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. दरम्यान यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेही मोठं नुकसान झालं आहे. संततधार पाऊस, त्यानंतर सोयाबीनवर झालेला गोगलगायींचा प्रादुर्भाव या एकामागून एक आलेल्या संकटांमुळं लातूर जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं मदत जाहीर केली मात्र, ती मदत शेतकऱ्यापर्यंत अद्याप पोहोचली नाही. त्यामुळं लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार धिरज देशमुख यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकार शेतकऱ्यांना ‘गोगलगायी’च्या गतीनेच मदत देणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

नेमकं धिरज देशमुख काय म्हणालेत

गोगलगायींचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी, संततधार पाऊस या एकामागून एक आलेल्या संकटांमुळे यंदा राज्यासह लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली. पण, ती मदत अद्याप शेतकरी बांधवांना मिळाली नसल्याचे धिरज देशमुख यांनी म्हटलं आहे. सरकार ही मदत गोगलगायीच्या गतीनेच देणार आहे का? असा सवाल आमदार धिरज देशमुख यांनी उपस्थित केला आहे. दसरा, ईद, दिवाळी हे सण जवळ आले आहेत. या सणांची तयारी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना करता यावी त्यांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलीत व्हावी म्हणून तरी सरकारने लवकर पावले उचलणे अपेक्षित असल्याचे धिरज देशमुख यांनी म्हटलं आहे.

लातूर जिल्ह्यात यावर्षी सगळ्याच तालुक्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. सततच्या पावसानं काही भागात पिकं पिवळी पडली आहेत. त्यातच जिल्ह्यातील अनेक भागात गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळं शेतकरी हैराण झाले आहेत. रेणापूर तालुक्यात सततच्या पावसामुळं आणि गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मदतीची मागणी केली होती. त्यानंतर सरकारनं मदत जाहीर केली खरी पण अद्याप शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचली नसल्याचे आमदार धिरज देशमुख यांनी म्हटलं आहे.
खरीप हंगामात सोयाबीनचे पीक ऐन जोमात आल्यानंतर शंखी गोगलगायीचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्यामुळं लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचे निर्देश दिले होते. यानुसार या 3 जिल्ह्यांना 98 कोटी 58 लाख रुपये निधी देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
शासनाने काढलेल्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील गोगलगायीमुळं 3822.35 हेक्टर क्षेत्र बाधित असून, त्यासाठी 2 कोटी 59 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. तर लातूर जिल्ह्यातील 59764.30 हेक्टर क्षेत्र बाधित असून, त्यासाठी 4 कोटी 63 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. सोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातील 283.83 हेक्टर क्षेत्र बाधित असून, त्यासाठी 19 कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed