• Tue. Apr 29th, 2025

राज्यातील लम्पी बाधितांपैकी ५० टक्के पशुधन रोगमुक्त – पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

Byjantaadmin

Oct 3, 2022

मुंबई, दि. 3 : राज्यामध्ये दि. 3 ऑक्टोबर 2022 अखेर 31 जिल्ह्यांमधील 2151 गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील 48,954 बाधित पशुधनापैकी 24,797  म्हणजे सुमारे 50 टक्के पशुधन रोगमुक्त झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

श्री. सिंह यांनी सांगितले की, राज्यातील बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर 109.31 लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून 105.62 लाख जनावरांना मोफत लसीकरण करण्यात आले आहे. अकोला, जळगांव, कोल्हापूर, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज सोमवार दि. 3 ऑक्टोबर रोजी 6 लाख लस मात्रा प्राप्त झाल्या आहेत. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण या आकडेवारी नुसार सुमारे 75.49 % गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.

राज्यात दि. 3 ऑक्टोबर अखेर जळगाव 326, अहमदनगर 201, धुळे 30, अकोला 308, पुणे 121, लातूर 19, औरंगाबाद 60, बीड 6, सातारा 144, बुलडाणा 270, अमरावती 168, उस्मानाबाद 6, कोल्हापूर 97, सांगली 19, यवतमाळ 2, सोलापूर 22, वाशिम 28, नाशिक 7, जालना 12, पालघर 2, ठाणे 24, नांदेड 17, नागपूर 5, हिंगोली 1, रायगड 4, नंदुरबार 15 व वर्धा 2 अशा एकूण 1916 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती न बाळगता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच उपचार सुरू झाल्यास लम्पी आजाराचा सामना करता येतो. या आजारात मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. लम्पीचा प्रादुर्भाव पाहता सर्व पशुपालकांनी संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले आहे.

लम्पी आजाराबाबत विभागाच्या काही सेवांची आवश्यकता वाटत असल्यास अथवा माहिती द्यायची असल्यास संबंधितांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना / तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय / जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. १८०० – २३३० – ४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ तत्काळ संपर्क साधावा, असेही आवाहन आयुक्त श्री. सिंह यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed