शेतीमालावरील वायदेबंदी उठविण्यासाठी लोकसभेत आवाज उठवावा :शेतकरी संघटनेचे खा.शृंगारे यांना निवेदन
लातूर/प्रतिनिधी:केंद्र शासनाच्या आदेशावरून सेबीने ७ धान्यांच्या वायदे बाजाराला बंदी घातलेली आहे.ही बंदी उठविण्यासाठी शेतकऱ्यांची बाजू घेऊन लोकसभेत आवाज उठवावा,अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने खा.सुधाकरराव शृंगारे यांना देण्यात आले.
सेबीने केंद्र सरकारच्या आदेशावरून तांदूळ,मूग,चना, सोयाबीन,मोहरी आदी शेतमालाच्या वायदे बाजारावरील बंदीला ३१ डिसेंबर २०२३पर्यंत मुदतवाढ दिली आहे.या निर्णयामुळे शेतमालाच्या किमती खालच्या पातळीवर राहत आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.केंद्र सरकार शेतमालाच्या व्यापारात हस्तक्षेप करून भाव पाडत आहे.यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असून आत्महत्या करत आहे.खासदार या नात्याने आपण या मतदारसंघातील जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहात. त्यामुळे हा विषय लोकसभेत मांडून केंद्र सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडावे,अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
स्वतंत्र भारत पार्टी व शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबई येथील सेबीच्या कार्यालयावर वायदेबंदी उठविण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी वायदेबंदी उठविण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती.परंतु वायदेबंदी उठविण्यात आली नाही.केंद्र सरकार व सेबीने दि.२४मार्च पर्यंत शेतीमालावरील वायदेबंदी रद्द करावी अन्यथा आपल्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके,बालाजी जाधव, कालिदास भंडे,दगडूसाहेब पडीले,वसंत कंदगुळे,करण भोसले,दत्तू मुगळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.