• Mon. Aug 18th, 2025

कृषि विभागाच्या ‘मिलेट रॅली’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Byjantaadmin

Feb 16, 2023

कृषि विभागाच्या ‘मिलेट रॅली’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

• आंतरराष्रीपलय पौष्टिक तृणधान्य वर्ष2023 अंतर्गत आयोजन
• आकर्षक रांगोळीतून पौष्टिक तृणधान्याबाबत जनजागृती
• ‘मिलेट मॅन’ने वेधले उपस्थितांचे लक्ष

लातूर, (जिमाका): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यानिमित्त पौष्टिक तृणधान्यविषयक जनजागृतीसाठी कृषि विभाग व इतर संलग्न विभागाच्या समन्वयाने ‘मिलेट रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे खासदार सुधाकर शृंगारे आणि जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, मांजरा कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ सचिन दिग्रसे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक राजाभाऊ मोराळे, मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अरुण गुट्टे, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. भांबरे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद पाटील, जिल्हा कृषि विकास अधिकारी सुभाष चोले, उपविभागीय कृषि अधिकारी महेश क्षीरसागर, आर. टी. जाधव, आत्मा प्रकल्प उपसंचालक रवींद्र पाटील यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.

तृणधान्य पिकाचे लागवड क्षेत्राच्या उत्पादकतेत वाढ करणे, ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा व राजगिरा या सारख्या तृणधान्याचे आहारातील महत्व व त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत कृषि विभाग व इतर संलग्न विभागाच्या समन्वयाने ‘मिलेट रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरु झालेली ही रॅली छत्रपती शिवाजी चौक, महात्मा गांधी चौक मार्गे गंजगोलाई येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. शेतकरी, नागरिकांसह केशवराज विद्यालय, राजमाता जिजामाता विद्यालय, कृषि महाविद्यालयातील पदव्युत्तर शाखेचे विद्यार्थी आणि कृषि व इतर सलंग्न विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी या रॅलीमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन कृषि पर्यवेक्षक सुर्यकांत लोखंडे व उद्धव फड यांनी केले.

आकर्षक रांगोळीतून आणि ‘मिलेट मॅन’ ठरले लक्षवेधी

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित केलेल्या ‘मिलेट रॅली’ उपक्रमानिमित्त कृषि विभागातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारात तृणधान्यांच्या सहाय्याने आकर्षक रांगोळी रेखाटली होती. यामाध्यमातून तृणधान्यांच्या पौष्टिकतेबाबत संदेश देण्यात आला. तसेच या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या दोन ‘मिलेट मॅन’नी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी ज्वारी, बाजरीच्या कणसांच्या सहाय्याने वेशभूषा केली होती.

तृणधान्यांचा आहारात समावेश आवश्यक : खा. सुधाकर शृंगारे

पूर्वी तृणधान्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आपल्या दैनंदिन आहारात केला जात होता. त्यामुळे लोकांचे आयुर्मान अधिक होते. आज आपल्या आहारातून तृणधान्य हद्दपार होत आहेत. त्याऐवजी फास्टफूडचा समावेश मोठ्या प्रमणात होता आहे. निरोगी आयुष्यासाठी तृणधान्यांचा समावेश आहारात असणे गरजेचे आहे. याविषयी लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त राबविण्यात येत असलेले उपक्रम उपयुक्त असल्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले.

तृणधान्यामुळे ग्राहक आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल : जिल्हाधिकारी

तृणधान्यांमध्ये पौष्टिक घटक अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे तृणधान्यांचे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्याचबरोबर तृणधान्य लागवडीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहील व शाश्वत शेतीसाठी मदत होईल. तृणधान्यांचा आहारातील वापरामुळे अशाप्रकारे दुहेरी फायदा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या आहारात तृणधान्याचा वापर करावा. तसेच शेतकऱ्यांनीही आपल्या शेतीमध्ये तृणधान्य लागवड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.

तृणधान्यांच्या वापरासाठी बचतगट, अंगणवाडीच्या माध्यमातून प्रयत्न -मुख्य कार्यकारी अधिकारी

तृणधान्यांमधून मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक मिळत असल्याने त्याचा आहारात वापर वाढविणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत बचतगटांच्या माध्यमातून तृणधान्यांपासून पौष्टिक पदार्थांची निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच अंगणवाडीमधील बालकांच्या आहारात तृणधान्यांचा वापर वाढवून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *