• Mon. Aug 18th, 2025

जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना

Byjantaadmin

Feb 16, 2023

जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना

लातूर, (जिमाका): जिल्ह्यात रेशीम उद्योगास पोषक वातावरण असल्याने, तसेच मागील दोन वर्षापासून रेशीम कोषास 55 ते 65 हजार प्रति क्विंटल दर मिळत असल्याने रेशीम शेतीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. रेशीम उद्योगाला चलना मिळावी, या उदेशाने यावर्षी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत नवीन रेशीम लागवड केलेल्या 40 शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून आज हे शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले. रोहयो उपजिल्हाधिकारी श्रीमती सुत्रावे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून अभ्यास दौऱ्याला प्रारंभ झाला.

आत्मा प्रकल्प उपसंचालक रवींद्र पाटील, रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट, लातूर बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक श्री. थडकर यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.

दोन दिवसीय शेतकरी अभ्यास दौऱ्यात बीड, जालना, औरंगाबाद व नांदेड या जिल्ह्यातील प्रगतशील रेशीम शेतकरी, उद्योजकांना भेटी देणार आहेत. दौऱ्यातील शेतकरी बीड येथील शासकीय कोष खरेदी बाजारपेठ, बीड जिल्ह्यातील मौजे काबी येथील नर्सरीच्या माध्यमातून दीड कोटी रुपये उत्पादन मिळवेल्या श्री. पिसाळ यांच्या नर्सरी बागेस भेट देणार आहेत. गेवराई तालुक्यातील मौजे रुई या रेशीम ग्रामला भेट देणार आहेत. या गावमध्ये 1200 एकर क्षेत्रावर तुती लागवड करून रेशीम उद्योगाच्या माध्यमातून संपूर्ण गावाचा आर्थिक स्तर उंचावलेला. या गावातील प्रगतशील शेतकरी व चॉकी सेंटरधारक यांच्या भेटीचे अभ्यास दौऱ्या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील महेको कंपनीचे नविन तयार झालेल्या अंडीपुंज केंद्रास भेट देतील, जालना जिल्ह्यातील शासकीय कोष बाजारपेठ व ॲटोमेटिक रेशीम धागा प्रकल्पास भेट देवून परतीच्या प्रवासात नांदेड जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना भेटी देवून अभ्यास दौऱ्याची सागता होणार आहे.

शेतकऱ्यांनी अभ्यास दौऱ्यावरून आल्यानंतर या दौऱ्यात मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्या शेतीमध्ये नवीन प्रयोग करून उत्पादनात वाढ करावी. रेशीम शेतीसाठी मनरेगामधून वेळेत लाभ मिळत असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम लागवड करावी, असे आवाहन श्रीमती सुत्रावे यांनी केले.

रेशीम उद्योगात सध्या कोषाला चांगला दर मिळत असल्याने कमी भांडवलावर रेशीम उद्योग करून अधिक उत्पन्न मिळवता येणे शक्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सुशिक्षीत तरुणानी रेशीम उद्योगाकडे वळण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *