• Mon. Aug 18th, 2025

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेला लातूर जिल्हा क्रीडा संकुलावर अत्यंत उत्साही वातावरणात सुरुवात

Byjantaadmin

Feb 16, 2023

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेला लातूर जिल्हा क्रीडा संकुलावर अत्यंत उत्साही वातावरणात सुरुवात

• लातूरचे खा. सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते आणि आ. अमित देशमुख, आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन
• राज्यातील 32 संघ 448 खेळाडू, 150 तांत्रिक समिती सदस्य सहभागी

लातूर, (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे अत्यंत उत्साही वातावरणात खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते ध्वज फडकवून आणि क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून उद्घाटन करण्यात आले.

या क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे उपाध्यक्ष आमदार अमित देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, राज्य हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे, सचिव संजय नाईक, जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष मोईज शेख, सचिव दत्ता सोमवंशी, विभागीय क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राजस्थानातील कोटा शहराप्रमाणे लातूर हे शिक्षणासाठीचे प्रसिद्ध हब झाले आहे. आता विविध खेळात प्रविण्य मिळवून लातूर जिल्ह्याचे खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळ आणि खेळाडू यांना प्रोत्साहन देतात. त्यामुळे येत्या काळात खेळातही आपण उत्कृष्ट कामगिरी करूया, असा विश्वास खासदार सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केला. लातूर जिल्ह्यातील खेळासाठी, क्रीडापटूंसाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही देऊन या स्पर्धेसाठी लातूरमध्ये आलेल्या खेळाडूंचे त्यांनी स्वागत केले.

लातूरमध्ये आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या. लातूर हे खेळासाठी अत्यंत अनुकूल असा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले. लातूर जिल्ह्यात हॉलीबॉल तर अगदी खेड्यापाड्यात प्रसिद्ध असा खेळ आहे, असे सांगून यासाठी राज्याची हॉलीबॉल प्रबोधिनी लातूरमध्ये व्हावी, अशी मागणी या स्पर्धेच्या आयोजन समितीचे उपाध्यक्ष आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केली.

देशात खेलो इंडियासारख्या स्पर्धामुळे खेळाला अतिशय पोषक वातावरण तयार झाले असून आता तालुका पातळीपर्यंत क्रीडा संकुल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळाला नेहमीच प्रोत्साहन देतात, खेळ आणि खेळाडुंचा सन्मान करतात. यापुढे अशा स्पर्धांचे वारंवार आयोजन करावे. त्यातून जिल्ह्यातील विद्यार्थी खेळाकडे आकर्षित होतील, असे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले. तसेच या राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाची संधी लातूरला दिल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांचे आभारही मानले.

या स्पर्धेमध्ये राज्यातील आठ विभागाच्या 21 व 18 वर्षांखालील मुला-मुलींचे एकूण 32 संघातील 448 खेळाडू, व्यवस्थापक व क्रीडा मार्गदर्शक सहभागी झाले आहेत. तसेच जवळपास दीडशे तांत्रिक समिती सदस्य, अधिकारी, पदाधिकारी व स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.

प्रास्ताविक क्रीडा विभागाचे उपसंचालक सुधीर मोरे यांनी केले. सूत्रसंचालन गालिब शेख यांनी केले, जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे सचिव दत्ता सोमवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

रोमहर्षक खेळाने जिंकली प्रेक्षकांची मने

उद्घाटन समारंभानंतर विविध खेळाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात महाराष्ट्राचा पारंपारिक मलखांब या खेळातील चित्तथरारक प्रात्यक्षिक मुले आणि मुलींनी दाखविली. देशीकेंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी काठी लोकनृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली.
*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *