• Mon. Aug 18th, 2025

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर महसूल विभागाचे बैठे पथक तैनात राहणार – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी

Byjantaadmin

Feb 16, 2023

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर महसूल विभागाचे बैठे पथक तैनात राहणार – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

• कॉपीमुक्त अभियानासाठी दक्षता समितीची बैठक
• भरारी पथके, पोलीस बंदोबस्तही तैनात

लातूर,  (जिमाका): इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर परीक्षेआधी एक तासापासून परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका ताब्यात घेईपर्यंत महसूल विभागाचे बैठे पथक तैनात राहणार आहे. तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस तैनात करून निवडणूक प्रक्रियेप्रमाणे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया हाताळली जाणार असल्याची माहिती जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

इयत्ता दहावी, बारावीच्या फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीडीसी सभागृहात आज आयोजित दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती तृप्ती अंधारे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल दशवंत, सर्व दहा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी तसेच इयत्ता दहावीच्या 149 परीक्षा केंद्राचे व इयत्ता बारावीच्या 92 परीक्षा केंद्रांचे केंद्र संचालक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात केंद्रनिहाय सुरक्षा व्यवस्था, भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच याबाबतच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा 02382-220204 हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. संवेदनशील केंद्राचे पुन्हा फेर सर्वेक्षण करण्यात येईल. तसेच आवश्यक तेथे जास्त खबरदारी घेवून परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकारांना आळा घालण्यात येईल. सर्व तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून गट शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्या समन्वयाने महसूल विभागाची प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक नियुक्त करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या.

परीक्षा केंद्रांवरील बैठे पथक परीक्षेआधी एक तासापासून ते परीक्षा झाल्यानंतर एक तासापर्यंत उपस्थित राहील. परीक्षा प्रक्रिया निवडणूक प्रक्रियेच्या धर्तीवर कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. तसेच परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांनी बोर्डाने दिलेले ओळखपत्र अनिवार्य आहे. या कॉपीमुक्ती अभियानात केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक परीक्षार्थीची तपासणी करूनच त्यांना परीक्षा कक्षात सोडावे. विद्यार्थिनींची तपासणी महिला तपासणीसामार्फतच करावी. परीक्षेच्या दरम्यान बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी परीक्षा कक्षामध्ये प्रवेश करू नये. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत व्यत्यय येवू नये, याची काळजी भरारी पथकाने घ्यावी. कॉपी आदली तर विद्यार्थी आणि संबंधित संस्थेवर कडक कार्यवाही करण्यात येईल. परीक्षा केंद्राच्या पन्नास मीटर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जावू नये, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर आवश्यक पोलिस बंदोबस्त देण्यात येणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी सर्वोतोपरी पोलीस प्रशासनामार्फत सर्वोतोपरी कार्यवाही करण्यात येईल. परीक्षा केंद्रावरील कॉपीबाबत कोणालाही माहिती द्यावयाची असल्यास किंवा काही तक्रार असल्यास 112 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले.

कॉपीमुक्ती अभियानात पालक, विद्यार्थी, शिक्षक यांनी करावयाची कार्यवाही आणि शासन निर्णयाची माहीती दिली. सूत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *