आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारास संभाजी ब्रिगेडचा विरोध !
निलंगा उपजिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…
पुरस्कार मागे न घेतल्यास जनआंदोलन : ता. अध्यक्ष प्रमोद कदम
निलंगा प्रतिनिधी : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारास संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शविला असून जातीयता, अंधश्रद्धा व खोटा इतिहास पसरविणाऱ्यांना दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने लातूर जिल्ह्यात जन आंदोलन उभारले जाईल. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे निलंगा तालुकाध्यक्ष प्रमोद कदम यांनी दिला आहे.
या संदर्भात बुधवार दि.15 रोजी संभाजी ब्रिगेडचे निलंगा तालुकाध्यक्ष प्रमोद कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे, सन १९९६ पासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार एका विशिष्ट विचारधारा आणि मानसिकतेच्या व्यक्तींनाच दिल्याचे दिसून येते. तथापि आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे फार मोठे सामाजिक कार्य नसून महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे नाव सुद्धा ठाऊक नाही, असे नमूद करत प्रमोद कदम म्हणाले, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी कोकणात एका विशिष्ट विचारधारेच्या बैठका भरवून जनतेच्या डोक्यात जातीयता, विषमता, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पुरावा नसलेला खोटा इतिहास, अंधश्रद्धा व धार्मिक गुलामगिरी पसरवण्याचे काम करत असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार त्यांना अटक करण्याऐवजी महाराष्ट्र शासनाने सन्मानाचा पुरस्कार जाहीर करून बहुजन समाजाच्या जनतेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला.
सदर पुरस्कार तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जन आंदोलन उभारले जाईल, असा इशारा एका निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी निलंगा यांना देण्यात आला.या निवेदनावर संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, उपाध्यक्ष भरत चव्हाण, शहराध्यक्ष परमेश्वर बोधले, ता. संघटक अमोल माने,ता. सहसचिव परमेश्वर नांगरे पाटील,ता. संघटक अरुण पवार, अर्जुन जाधव, राम भोयबर ज्ञानेश्वर राठोडकर, परमेश्वर जाधव, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.