नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासू अदानी समूह आणि एलआयसीच्या त्यामधील गुंतवणुकीमुळे पॉलिसीधारकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अदानी समूहासंबंधित अहवालानंतर एलआयसीच्या पॉलिसीधारकांमध्ये चिंता वाढू लागल्या. आयुर्विमा महामंडळात आपल्या ठेवी सुरक्षित आहेत की नाही अशी विमाधारकांना चिंता वाटत होती. पण आ आता एलआयसीच्या विमाधारकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. चर्च असलेल्या अदानी समूहाच्या प्रकरणादरम्यान एलआयसीने दाखवून दिलं की ते किती मजबूत आहेत.
गौतम अदानी आणि हिंडेनबर्ग प्रकरणादरम्यान एलआयसीच्या नफ्यात बंपर वाढ झाली आहे. एलआयसीने चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ तिमाही निकाल जाहीर केले ज्यात एलआयसीच्या उत्पन्नात १४.५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले. यासह एलआयसी किंवा भारतीय आयुर्विमा महामंडळाचा निव्वळ नफा ८३३४.२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत एलआयसीचा निव्वळ नफा २३५ कोटी रुपये, तर सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा १५,९५२ कोटी रुपये होता.
एलआयसी फायद्यात
आयुर्विमा महामंडळाने शेअर बाजाराला आपल्या तिमाही निकालांची माहिती दिली. विमा कंपनीने सांगितले की डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत त्यांचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न १११७८७.६ कोटी रुपये होते. तर गेल्या वर्षी म्हणजेच २०२१-२२ मध्ये याच तिमाहीत ९७६२९.३४ कोटी रुपये होते.
अदानींवर काय बोलली एलआयसी
अदानी समूहाच्या प्रकरणावर विमाधारकांना एलआयसीने म्हटले की अदानी प्रकरण समजून घेण्यासाठी ते लवकरच कंपनीच्या उच्च व्यवस्थापनाला भेटतील. एलआयसीचे अध्यक्ष एमआर कुमार म्हणाले की, “आम्ही लवकरच अदानी समूहाच्या उच्च व्यवस्थापनाला भेटू आणि या वादातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या योजना समजून घेण्याचा प्रयत्न करू.” त्यांनी म्हटले की ही बाब समोर आल्यानंतरच एलआयसीच्या गुंतवणूक विभागाने अदानी समूहाशी संपर्क साधला.
एलआयसीचा विमाधारकांना आश्वासन
याशिवाय एलआयसीने आपल्या विमाधारकांना याबद्दल काळजी न करण्या सांगितले. त्यांनी सांगितले की त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी केवळ ०.९७ टक्के व्यवस्थापन अंतर्गत म्हणजेच AMU अदानी समूहात गुंतवली असून अदानींच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ४४.३४ लाख कोटी आहे. म्हणजेच एलआयसीच्या विमाधारकाची रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे. एलआयसीने अदानी ग्रुपमध्ये म्हणजे इक्विटी आणि डेटमध्ये एकूण ३५ हजार ९१७ कोटींची गुंतवणूक केली आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत किसनराव कराड यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की, २७ जानेवारीपर्यंत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य ५६,१४२ कोटी होते. दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी एलआयसीचे शेअर्स ०.५३ टक्क्यांनी वाढून ६१३ रुपयांवर बंद झाला.