पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. दुपारपर्यंत साधारण 2 वाजेपर्यंत त्यांचे मुंबईत आगमन होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहेत. मुंबई-शिर्डी पहिल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे ठाणे स्थानकात जंगी स्वागत दुपारी 3.20 वाजता करण्यात येणार आहे.
दौऱ्यामागील राजकारण
याशिवाय अंधेरी (पूर्व) येथे असलेल्या दाऊदी बोहरा समाजाच्या शैक्षणिक संस्थेचे उद्घाटन करून ते भाजपसाठी मुस्लिम समाजाचे राजकीय समीकरणही घडवून आणणार आहेत.
मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा राजकीय दृष्टिकोनातून महाराष्ट्र भाजपसाठी खूप फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा आहे. कारण मराठी भाषिक मुस्लीम मतदार शिवसेना (उद्धव गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत असताना पंतप्रधान मोदी दाऊदी बोहरा समाजाच्या मनात भाजपबद्दल आत्मीयता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
काही दिवसांत दुसऱ्यांदा मुंबईत
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत पंतप्रधानांचा हा दुसरा मोठा मुंबई दौरा आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईत सुमारे 38,800 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन केले होते. पंतप्रधान मोदींनी जानेवारी महिन्यात त्यांच्या मुंबई दौऱ्यात मुंबईकरांना मेट्रो ट्रेन भेट दिली होती.
मुंबईहून सोलापूरला दीड तास लवकर पोहोचणार
वंदे भारत रेल्वे सुरू झाल्यावर मुंबईहून सोलापूरला दीड तास लवकर पोहोचता येणार आहे. सध्याच्या सुपरफास्ट ट्रेनला मुंबईहून सोलापूरला पोहोचण्यासाठी 7 तास 55 मिनिटे लागतात. वंदे भारत ट्रेनने हा प्रवास 6 तास 30 मिनिटांत पूर्ण होईल. या रेल्वेमुळे सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, आळंदी (पुणे) या धार्मिक स्थळांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
मुंबई ते शिर्डी, पुन्हा मुंबई एका दिवसात
तसेच, मुंबई-शिर्डी वंदे भारत रेल्वे सुरू झाल्याने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन एका दिवसात मुंबईला परतणे शक्य होणार आहे. कारण ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी 6.15 वाजता सुटेल आणि साई नगर शिर्डीला दुपारी 12.10 वाजता पोहोचेल. यानंतर ही गाडी साई नगर शिर्डी स्थानकातून सायंकाळी 5.25 वाजता सुटेल आणि रात्री 11.18 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.