गांधी टोपी, जॅकेट अन् फडणवीस- जयंतरावांची जुगलबंदी…
निलंगा:-माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा नेहमीचा पोषाख हा साधेपणाचा असतो, मात्र आज आजोबा माजी मुख्यमंत्री डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारक अनावरण कार्यक्रमात त्यांनी त्यांची काॅपी केली. आजोबांसारखीच डोक्यावर गांधी टोपी आणि अंगात जॅकेट घालून ते सगळ्या कार्यक्रमात वावरत होते.
त्यांचा हा नवा लूक पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी पाटील निलंगेकरांच्या या वेषभुषेचे कौतुक करतांना गांधी टोपी विचारांची, तर जॅकेट विकासाचे असल्याचे म्हटले. तर जयंत पाटील यांनी संभाजी पाटलांना गांधी विचारांवर चला, असा टोला लगावला. आज शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी आपण टोपी आणि जॅकेट का घातले ? याचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, माझे आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा पेहराव म्हणजे जॅकेट आणि टोपी असा होता. माझी आजी सुशीलाबाई निलंगेकर यांनी आज कार्यक्रमाच्या निमित्ताने जॅकेट व टोपी घालण्याचा आग्रह केला.
याबाबत माजीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोटी करत शिवाजीराव पाटील निलंगेकर हे जनतेशी नाळ जुळलेले नेते होते. त्यांनी महात्मा गांधी यांचा विचार कधीच सोडला नाही, त्यांच्याकडे विचाराची स्पष्टता होती. शिवाय पक्षपातळीवर दबदबा असल्याने अनेक सिंचनाची कामे त्यांनी त्यांच्या काळात पूर्ण केल्याची आठवण सांगितली.
संभाजीराव यांनी घातलेली गांधी टोपी काँग्रेसच्या विचाराची आहे अख्खा देश या विचारावर चालतो, तुम्ही पण चला असा चिमटा काढला. यावर हजरजबाबी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात उत्तर दिले. काँग्रेस पक्षाने महात्मा गांधीना गांधी टोपी पुरतेच ठेवले आहे. देशाला गांधीजीच्या विचारांची गरज आहे.
टोपी कोणतीही असो, संभाजीरावांनी आता विचारांची टोपी अन् विकासाचे जॅकेट घातले आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या विकासाच्या ध्यासाचा विचार ते पूर्ण करतील, असे सांगून जयंत पाटील यांच्यावर कडी केली. टोपी आणि जॅकेट वरून फडणवीस-पाटील यांच्यातील जुगलबंदीचा आनंद मात्र उपस्थितांनी पुरेपूर घेतला.