राज्याच्या अर्थसंकल्पात फक्त पोकळ घोषणाच असतील..
पक्षाच्या बैठकीसाठी ते आज लातूर जिल्ह्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी विविध विषयावर आपले मत व्यक्त केले.राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मांडणार आहेत. पण त्यामध्ये पोकळ घोषणां व्यतिरिक्त काहीच नसेल, असे ते म्हणाले.
राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे पुर्णपणे गोंधळलेले आहे. त्यांना सरकार टिकते की राहते? याची सतत भिती असते. त्यांना याच चिंतेने ग्रासल्यामुळे ते जनतेच्या हिताचे कुठलेही निर्णय घेवू शकत नाहीयेत. ज्या सरकारवर टांगती तलवार असते, त्या सरकारचा आत्मविश्वास कमी असतो, अशीच काहीशी परिस्थिती सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारची झाली आहे.
आत्मविश्वास गमावलेले हे सरकार असल्याने त्यांच्याकडून राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा करणेच चुकीचे असल्याचे पाटील म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील राज्याच्या विकासाच्या निर्णयांना देखील या सरकारने स्थगिती देण्याचा धडका लावला होता. दुसरीकडे राज्यातील उद्योग गुजरात, कर्नाटकमध्ये पळवले गेले. मग डबल इंजिनचे सरकार असल्याचा दावा करणारे सरकार विकासाच्या गप्पा कशाच्या जोरावर मारत आहे? असा सवाल देखील पाटील यांनी केला.
सरकारचं काय होईल याची प्रचंड भिती सत्ताधाऱ्यांना आहे, या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. त्यामुळे आत्मविश्वास गमावलेल्या सरकारकडून राज्यासाठी कुठलेही ठोस निर्णय घेतले जात नाहीत. येणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात निवडणूका डोळ्यासमोर ठेवून नुसत्या पोकळ घोषणा केल्या जातील, याचा पुनरुच्चार देखील पाटील यांनी यावेळी केला.