देवेंद्र फडणवीस म्हणाले-बात निकली तो दुर तक जाएगी
गोंदिया:-मी आणि प्रफुल पटेल एकत्र आलो त्यामुळे चर्चा तर होणारच, बात निकली तो दुर तक जाएगी. प्रफुल पटेलांचे कार्य उत्तम आहे. त्यामुळे ते जे काम करतात, ते चांगले आहे. आमची जेव्हाही गरज पडेल आम्ही तुमच्या सोबत राहू असा सूचक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.
अनेकांच्या भुवया उंचावल्या
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्यावर काल इडीने कारवाई केली. त्यानंतर आज प्रफुल पटेल आणि देवेंद्र फडणवीस गोंदीया येथे एकाच मंचावर दिसले. त्यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. मनोहर पटेल यांना आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात फडणवीसांनी प्रफुल पटेल यांना आश्वासित केले व सूचक इशारा देत जेव्हा गरज पडेल आम्ही तुमची साथ देऊ असे वक्तव्य केले.
हे होते एकत्र येण्याचे कारण
प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहर भाई पटेल यांच्या 117 व्या जयंतीनिमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रफुल पटेल यांनी निमंत्रण दिल्यानंतर फडणवीस मनोहर पटेल यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ते आले होते. आजच्या कार्यक्रमात अभिनेते जॅकी श्राॅफ, माजी खासदार विजय दर्डा यांची उपस्थिती होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज सर्वात मोठे परिवर्तन हे झाले की, विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत शिक्षण घेता येणार आहे. मराठीतून अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे. सर्व भाषांत उच्च आणि तंत्रशिक्षण घेता येणार आहे. हे पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. येत्या काळात भारताच्या विकासात ग्रामीण भागातील तरुणांचे मोठे योगदान राहणार आहे.
समृद्धी हायवे गोंदीया गडचिरोलीपर्यंत
देवेंद्र फडणवीस म्हणाले, समृद्धी हायवे गोंदीयापर्यंत आम्ही आणणार आहोत. नागपूर – गोंदीया हे अंतर एक तासात कापता येईल. तोच हायवे पुढे गडचिरोलीतही नेणार आहोत. या महामार्गाची कनेक्टिव्हीटी विदर्भात करणार असल्याने आता अन्यधान्य उत्पन्न आणि व्यवहाराला चालना मिळेल.
चर्चा तर होणारच..
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तूम्ही आणि मी एकाच मंचावर आलो त्यामुळे चर्चा तर होणारच. बात निकली तो दुर तक जाएगी. त्याची चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे की, राजकारणात विचारांचे विरोधी असतो व्यक्तीचे नसतो. निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात उभे राहू पण नंतर सोबत चहाही घेवू शकतो. एकाच मंचावर येऊ शकतो. जोपर्यंत ही संस्कृती आपल्यासोबत आहे, तोपर्यंत आपल्या विकासाला कुणी रोखू शकत नाही. तुम्ही जे काम करता ते चांगले आहे. आम्हची जेव्हाही गरज पडेल आम्ही तुमच्या सोबत राहू.